Headlines

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कटफळ येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा विकसित:20 एकर जागेत राष्ट्रीय स्पर्धांसाठी सुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर भर




उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. २० एकर जागेत या सुविधा उभारल्या जाणार असून, त्यामध्ये सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने कामे करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवन येथील झुंबर सभागृह येथे आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले आणि क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते. पवार यांनी कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेच्या आयोजनाबाबतही चर्चा केली. बारामती येथे प्रस्तावित असलेल्या या स्पर्धेची तारीख पर्जन्यमान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच पालखी सोहळ्याचा विचार करून निश्चित करावी, असे त्यांनी सुचवले. जिल्हा क्रीडा संकुल पुणे (बारामती) च्या देखभाल दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर आणि प्रतिभावंत खेळाडू घडवण्यावर क्रीडा विभागाने भर द्यावा, असेही पवार म्हणाल्या. बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी क्रीडा संकुल देखभाल दुरुस्ती, नवीन क्रीडा साहित्य खरेदी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला लागणारा निधी वर्ग करणे या विषयांवर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते हिंद केसरी महेंद्र गायकवाड, जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नितीन पवळे, गोकर्ण शर्मा आणि जागतिक ट्रेडिशनल ग्रुप व हँडसेट खेळात सुवर्णपदक विजेता निरल वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *