![]()
अमरावती शहरातील दाट लोकवस्तीच्या पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारी पाणीपुरवठा खंडित झाला. यामुळे सुमारे ६ हजार कुटुंबांमधील २५ हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वरच्या काही भागातील नागरिकांना दिवसभर पाण्याविना राहावे लागले. अनेकांनी साठवलेल्या पाण्याचा वापर केला, तर काहींनी पर्यायी व्यवस्था केली. जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला जमिनीखाली दीड मीटर खोलवर असलेल्या ‘डक फूट बेन्ड’ या ठिकाणी गळती लागली आहे. हा ‘डक फूट बेन्ड’ उभा पाईप जमिनीतील आडव्या जलवाहिनीशी जोडतो. विशेष म्हणजे, जमिनीखालील या भागाची दुरुस्ती कोणत्याही यंत्राद्वारे करता येत नाही; ती केवळ मानवी हातांनीच करावी लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपासूनच दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. गळतीमुळे जलकुंभाखालील भाग दलदलीचा झाला आहे, त्यामुळे आधी ती दलदल बाजूला सारून दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. कामाच्या ठिकाणी एकाच वेळी फार तर पाच-सहा कर्मचारीच काम करू शकतात. मजीप्राच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, दुरुस्तीचे काम मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, दुरुस्तीदरम्यान आणखी काही बिघाड झाल्यास हा कालावधी वाढू शकतो. उपविभागीय अधिकारी संजय लेवरकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, “दुरुस्तीला किमान ३६ तास लागतील. आमचे कर्मचारी-अधिकारी अहोरात्र कामाच्या तयारीत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे.” मजीप्राने दुरुस्तीचे काम अहोरात्र सुरू ठेवले आहे. दुरुस्ती पूर्ण होताच पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. तोपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.
Source link
पार्वती नगरातील जलकुंभाची पाईपलाईन फुटली:6 हजार कुटुंबांना पाणीटंचाई; वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर प्रभावित