![]()
रविवारी सायंकाळी मोर्शी शहर आणि तालुक्यातील पाळा, भाईपूर, मायवाडी या शेत शिवारात अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आंबिया बहर पूर्णपणे नष्ट झाला आहे. मोर्शी महसूल मंडळातील मोर्शी, भाईपूर, मायवाडी आणि पाळा येथील काही संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडांवर लागलेली आवळ्यापेक्षा मोठी झालेली आंबिया बहराची संत्रा फळेही खाली कोसळली. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वादळामुळे शेतातील धुऱ्यावरील अनेक मोठी झाडेही उन्मळून पडली. काही शेतातील रखवालदारांच्या झोपड्यांवरील टीनपत्रे उडून गेली, ज्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. राय कॉलनी परिसरात बोराएवढी गार पडली, तर सिंभोरा रोडवरील श्रीराम कॉलनी येथे झाडे कोसळून चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. या घटनेनंतर दीड ते दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी केली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शहरातील एसटी डेपो जवळच्या अप्पर वर्धा कॉलनी मार्गावरील महावितरणचे सहा वीज खांब खालीपर्यंत वाकले. काही झाडेही उन्मळून पडली आणि दुकानांवरील टीनपत्रे उडून गेली, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
Source link
मोर्शीत वादळी पाऊस, गारपीटमुळे संत्रा झाडे भुईसपाट:आंबिया बहर गमावला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान