![]()
कळमनुरी येथील सी कॉमर्स मायक्रो फायनांन्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने महिला बचतगटाच्या पैशाची वसुली करून त्यांच्या खात्यात भरणा केलीच नसल्याचे उघड झाले असून या प्रकरणी वसुली कर्मचाऱ्यावर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथे सी कॉमर्स मायक्रो फायनांन्स कंपनीची शाखा आहे. या शाखेकडून महिला बचतगटांना विविध व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. त्यानंतर या गटांकडून हप्तेवारी कर्जाच्या रकमेची वसुली केली जाते. त्यासाठी कंपनीकडून वसुली कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांनी बचतगटाकडून केलेल्या वसुलीची रक्कम दररोज शाखेत भरणा करणे अपेक्षीत आहे. दरम्यान, शाखेचे वसुली कर्मचारी हनुमान ढोबळे याने महिला बचतगटाकडून ता. 1 फेब्रुवारी ते ता. 9 फेब्रुवारी या कालावधीत कर्जाच्या हप्त्याची वसुली केली. मात्र सदर वसुलीची 93 हजार रुपयांची रक्कम शाखेत भरणा न करता स्वतः खर्च केली. काही दिवसानंतर काही महिलांनी त्यांच्या कर्जखात्याची चौकशी केली असता त्यात कर्जाच्या हप्त्याचा भरणा केला नसल्याचे दिसून आले. याबाबत त्या महिलांनी शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारही केली. या तक्रारीनंतर शाखेने तातडीने चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये हनुुमान याने 30 महिला बचतगटाकडून कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल केली मात्र सदर रक्कम शाखेत भरणा केली नसल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये हिंगोली, कळमनुरी, इसापूर रमना, इसापूर तांडा या भागातील महिला बचतगटाचा समावेश आहे. या प्रकरणी शाखेचे अधिकारी अमोल गोलाम यांनी सोमवारी 15 रात्री कळमनुरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी हनुमान ढोबळे (रा. असोला तर्फे औंढा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार पोले पुढील तपास करीत आहेत.
Source link
30 महिला बचतगटांची फसवणूक!:हप्त्याचे पैसे बँकेत न भरता वसुली कर्मचाऱ्यानेच केले फस्त