Headlines

डिझेल विक्रीवरील निर्बंधांमुळे खरीप हंगाम संकटात:शेतकऱ्यांमध्ये संताप, शेतीसाठी डिझेल आणायचे कसे, नामपूरमधील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल‎




कॅन, ड्रम किंवा बाटलीत डिझेल-पेट्रोल विक्रीवर बंदी आणि एका वेळी मर्यादित इंधन वितरणाच्या नव्या नियमामुळे नामपूरसह परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील मशागत आणि पेरणीची कामे सुरू असताना कृषी पंप, जनरेटर आणि ट्रॅक्टरसाठी इंधन उपलब्ध करून देणे कठीण झाले असून, शेतीकामे खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार आणि ११ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या भारतीय राजपत्रानुसार पेट्रोल पंपांवर कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एका ग्राहकाला किंवा वाहनाला एका वेळी १९० लिटरपेक्षा जास्त डिझेल न देण्याची अट लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून, शेतकरी मशागतीची कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. अनेक शेतजमिनी पेट्रोल पंपांपासून दूर असल्याने ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रसामग्री थेट पंपावर नेऊन इंधन भरणे वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे. त्यामुळे शेतीकामांच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐन पेरणी आणि मशागतीच्या काळात लागू झालेल्या या नियमाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कृषी विभाग किंवा महसूल विभागाच्या प्रमाणपत्रावर शेतीकामांसाठी ठरावीक प्रमाणात ड्रममध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. डिझेलअभावी मजुरांचा खोळंबा, खर्चात वाढ शेतीकामासाठी मजूर मिळणे आधीच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर किंवा यंत्रांचे इंधन संपल्यास ते पंपावर नेण्यासाठी वेळ खर्च करावा लागतो. तोपर्यंत मजुरांना रिकामे बसवावे लागते. काम न झाल्यासही मजुरी द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. शासनस्तरावर मार्ग काढण्यासाठी अहवाल पाठवला आहे ^शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व इंधन विक्रेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत. सध्या ग्रामीण भागात मशागत आणि पेरणीची कामे सुरू असल्याने या निर्णयाचा शेती व्यवसायावर परिणाम होत आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, शासनस्तरावर मार्ग काढण्यासाठी आवश्यक माहिती पाठविण्यात आली आहे. – कैलास चावडे, तहसीलदार ग्राहक व पेट्रोल पंपचालकांत वाद वाढण्याची शक्यता ^शासनाच्या निर्देशानुसार कॅन, ड्रम आणि बाटलीत पेट्रोल-डिझेल देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहक आणि पंपचालकांमध्ये वाद वाढण्याचे प्रमाण दिसून येत आहे. सर्वांना इंधन उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये वाद होणार नाही, यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना द्याव्यात . – महेश मुथा, महावीर पेट्रोलियम, नामपूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *