![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कडक इशारा दिला आहे की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल. अशा परिस्थितीत, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते संबंधित खासदारांच्या घरांसमोर तीव्र निदर्शने करतील. तिवारी म्हणाले की, मोदी सरकारच्या असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी कृत्यांमुळे देशाची राष्ट्रीय संपत्ती आणि संविधान वाचवण्यासाठी जनतेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीला स्पष्ट कौल दिला आहे. जनतेने संसदेत एक मजबूत विरोधी पक्ष दिला असून, काँग्रेसच्या खासदारांची संख्या ५२ वरून १०२ पर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, केंद्रातील सत्ताधारी भाजपने ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि निवडणूक आयोग यांसारख्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आचारसंहिता धुडकावून आणि सरकारी तिजोरीतून प्रचंड खर्च करून प्रचार केला, तरीही ‘अब की बार ४०० पार’चा नारा देणाऱ्या भाजपचे संख्याबळ ३५ टक्क्यांनी कमी होऊन २४० वर आले, हे वास्तव नाकारता येणार नाही. मोदी सरकार २०२४ मध्ये केवळ नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षांच्या टेकूवर सत्तेवर आले आहे. भाजपला देशातील केवळ ३८ टक्के मतदारांनी कौल दिला आहे. असे असतानाही, नैतिकता झुगारून आणि अहंकारीपणे विरोधी पक्षांचा कौल डावलून जर निवडून आलेले खासदार कथित २/३ संख्याबळाचा आणि कायद्यातील पळवाटांचा आधार घेत सत्तेच्या दरोडेखोरांमध्ये सामील होत असतील, तर ही ‘लोकशाहीच्या हत्येचा तमाशा’ आहे, असा संतप्त सवाल काँग्रेसने उपस्थित केला. महाराष्ट्रामध्येही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपप्रणीत एनडीएपेक्षा ‘काँग्रेस-इंडिया आघाडी’चेच २/३ पेक्षा जास्त खासदार निवडून दिले आहेत. इंडिया आघाडीच्या, विशेषतः शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संभाव्य दलबदलू खासदारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे खुद्द उच्च न्यायालयाने ओढले आहेत. त्यामुळे अनैतिक मार्गाने सत्तेत राहणाऱ्या या ‘चोरांच्या’ विरोधात राहुल गांधी यांच्या भाषेत प्रतिकार करण्यासाठी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असे गोपाळ तिवारी यांनी स्पष्ट केले.
Source link
पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात 'इंडिया' आघाडी निदर्शनं करणार:काँग्रेसचा इशारा; जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप