![]()
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) पुस्तकाच्या ब्रेल आणि ध्वनिमुद्रित (ऑडिओ) आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. गोसावी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्य घडविणारे तंत्रज्ञान असून त्याचे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते. डॉ. गोसावी यांनी डॉ. शिकारपूर यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, यामुळे समावेशक शिक्षणाचा आदर्श निर्माण झाला असून हे ज्ञानलोकशाहीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले. राष्ट्रीय अंध महासंघ, महाराष्ट्रच्या प्रवक्त्या साकिना बेदी, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक विनायक जोशी, मानव्य विज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रभाकर देसाई, माजी अधिष्ठाता सुप्रिया पाटील आणि सविता गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. दीपक शिकारपूर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, तंत्रज्ञानाचा खरा उद्देश सर्वांना सक्षम करणे हा आहे. ज्ञानाच्या प्रवाहातून कोणताही घटक वंचित राहू नये, या भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती सर्वसमावेशक असली पाहिजे आणि त्यासाठी ज्ञान सर्वांसाठी सुलभ करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय अंध महासंघ, महाराष्ट्रच्या प्रवक्त्या साकिना बेदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दृष्टिहीन समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा महत्त्वाचा विषय आता ब्रेल आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना नवे क्षितिज खुले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. तंत्रज्ञान, शिक्षण आणि सामाजिक समावेशकतेचा संगम घडविणारा हा उपक्रम दृष्टिहीन समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Source link
डॉ. शिकारपूर यांच्या AI पुस्तकाच्या ब्रेल, ऑडिओ आवृत्तीचे प्रकाशन:डॉ. गोसावी म्हणाले; AI तंत्रज्ञान प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे