Headlines

कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला भीषण आग:शॉर्टसर्किटमुळे दप्तर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान; सखोल चौकशीची मागणी




नागपूर येथील कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यात नगराध्यक्षांचे केबिन, संगणक, फर्निचर आणि महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला लागलेल्या या आगीमुळे शहरात उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून, नागरिकांकडून सखोल चौकशीची मागणी होत आहे. पहाटे कार्यालयातून धूर निघत असल्याचे रात्रपाळीतील कर्मचारी गुंडेराव कुमरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीचे रौद्ररूप पाहून कळमेश्वरसह वाडी, सावनेर आणि मोहपा येथील अग्निशमन वाहनांना बोलावण्यात आले. चारही नगरपरिषदांच्या दलांनी अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत आस्थापना, आरोग्य आणि आवक-जावक विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने बांधकाम, मालमत्ता कर, अकाउंट आणि जन्म-मृत्यू विभागाची कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी, पोलीस ठाणेदार मनोज काळबांडे आणि मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत, महत्त्वाचे टॅक्स व इतर रेकॉर्ड सुरक्षित असल्याचे सांगितले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या, १८ जूनपासून नगरपरिषद परिसरातील नगर भवन येथून पालिकेचे नियमित कामकाज सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार आशिष देशमुख यांनी कळमेश्वर नगरपरिषदेची आग दुर्दैवी असल्याचे म्हटले. त्यांनी आग विझवण्यातील यंत्रणेची तत्परता आणि प्रशासकीय जबाबदारीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच, पालिकेचे कामकाज तातडीने सुरू व्हावे आणि नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असेही देशमुख यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *