Headlines

शरणापूरला रंगणार ‘हिंदकेसरी बैलगाडा शर्यत’:देशपातळीवरील स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच केले आयोजन‎




दौलताबाद बैलगाडा शर्यतीचे संभाजीनगरला पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले असून, शरणापूर येथील भांगशी माता गडाच्या पायथ्याशी भारतातील मानाचे पहिले ‘हिंदकेसरी मैदान’ सज्ज झाले आहे. येत्या रविवारी (२१ जून) सकाळी ७ वाजेपासून या भव्य हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. बैलगाडा शर्यत म्हटली की पश्चिम महाराष्ट्र, पुणे, आंबेगावचा घाट किंवा मुंबईची बिनजोड शर्यत आठवते. मात्र, काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका वादामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा संघटनांनी या शर्यती केवळ त्यांच्या विभागापुरत्याच मर्यादित ठेवण्याची घोषणा केली होती. यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातील बैलगाडा मालक व चालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. बंदीला उत्तर देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा व बैलगाडाप्रेमींचा स्वाभिमान जपण्यासाठी प्रसिद्ध बैलगाडा मालक सर्जेराव चव्हाण आणि मनोहर चव्हाण यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्र येथील सर्व बैलगाडा मालकांनी एकत्र येत सर्जेराव पाटील मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे हक्काचे ‘हिंदकेसरी मैदान’ निर्माण करण्यात आले आहे. हे मैदान कुणासाठीही मर्यादित नसून भारताचे प्रतिनिधित्व करेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या हिंदकेसरी शर्यतीमध्ये संपूर्ण भारतातून कोणत्याही प्रांतातील बैलगाड्यांना मुक्त प्रवेश दिला जाणार आहे. जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी व शौकिनांनी २१ जून रोजी शरणपूरच्या मैदानावर उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सर्जेराव पाटील मित्रमंडळ व आयोजकांनी केले आहे. मराठवाड्यात उत्तम दर्जाच्या बैलजोड्या गेल्या काही वर्षांत मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातही उत्तम दर्जाच्या बैलजोड्या तयार झाल्या असून, त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मैदानांवर मोठी बक्षिसे जिंकली. हा वाढता प्रभाव पाहून तेथील स्थानिक संघटनांनी इतर विभागांवर बंदी घातली होती. या मैदानाच्या निर्मितीमुळे आता भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील बैलगाडा चालक-मालक येथे सहभागी होऊ शकतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *