Headlines

शिवना येथील आयुष्मान आरोग्य मंदिर पाण्याविना:पाणी विकत घेण्याची वेळ, पाण्याचा थेंबही नाही; प्रसूतीसाठी आलेल्या महिला अन् वृद्धांचे अतोनात हाल




ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यावश्यक तसेच मूलभूत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सुरू करण्यात आलेले ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ सध्या भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने, हे आरोग्य मंदिर पाण्याविना कोरडे पडले आहे. परिणामी, उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना चक्क बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तब्बल २० हजारांहून अधिक लोकसंख्या आणि आसपासच्या २५ खेड्यांचा भार सांभाळणाऱ्या या आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत शिवाजीनगर वसाहतीला लागून उभी आहे. शासनाकडून या आरोग्य मंदिरावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला, मात्र तरीही येथे येणाऱ्या रुग्णांना साध्या मूलभूत आणि भौतिक सुविधा मिळणेही दुरापास्त झाले आहे. येथील नळ योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने पाण्याअभावी दवाखान्यातील स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्य केंद्राच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी आणि स्थानिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी येथे ‘जन आरोग्य समिती’ स्थापन करण्यात आली आहे. मात्र, ही समिती केवळ कागदावरच मर्यादित आहे का, असा प्रश्न पडत आहे. समितीचे सदस्य आणि संबंधित आरोग्य अधिकारी या अत्यंत गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. जिल्हा परिषद सदस्या निकिता राजू काळे यांनी सोमवारी या शिवना आरोग्य मंदिरास अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. निकिता काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्था तातडीने सुधारण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. तसेच, आरोग्य विभागासंबंधी नागरिकांना काहीही अडचणी असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. रुग्णांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही जिल्हा परिषद सदस्या निकीता काळे यांनी दिला आहे. गरिबांना मोफत उपचारांचा दावा फोल सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला आणि वृद्ध रुग्णांना पाण्यासाठी प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून जार विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना मोफत आणि दर्जेदार उपचार देण्याचा प्रशासनाचा दावा साफ फोल ठरल्याचे दिसून येत आहे. दहा दिवसांआड पाणी गाव तलावाला लागून असलेल्या विहिरीतून या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू होता. मात्र गेल्या महिनाभरापासून विहिरीतील पाणी संपले आहे. परिणामी दवाखान्यात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. -डॉ. आकाश दौड, आरोग्य अधिकारी शिवना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *