.

धडपड मंचच्या वतीने राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शहरातील खांबेकर खुंट येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी इतिहासतज्ञ नारायणराव क्षीरसागर यांच्या हस्ते आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाराणा प्रताप यांच्या भव्य कट आऊटचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आणि राष्ट्रप्रेमाला उजाळा दिला. या कार्यक्रमाला धडपड मंचाचे अध्यक्ष प्रभाकर झळके, जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण शिंदे, खटपट युवा मंचाचे अध्यक्ष मुकेश लचके, तसेच प्राध्यापक व माजी प्राचार्य दत्ता नागडेकर आदींसह परिसरातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांना महाराणा प्रताप यांच्या जीवनातील संघर्ष, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. महाराणा प्रताप यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी युवकांनी महाराणा प्रताप यांच्या कार्यावर आधारित घोषवाक्यांद्वारे जनजागृती केली. उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धडपड मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. सटाणा येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक. प्रतिनिधी | सटाणा बागलाण तालुका महाराणा प्रताप जयंती महोत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या ३८६ व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिवादन कार्यक्रम, तर सायंकाळी अश्वारूढ पुतळ्यासह पाच तास रथ मिरवणूक, ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त दोधेश्वरनाका परिसर भगवे ध्वज, बॅनर आणि आकर्षक सजावटीने नटविण्यात आला होता. सकाळी १० वाजता आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा हर्षदा सोनवणे, माजी आमदार संजय चव्हाण, नगरसेवक मंगेश खैरणार, मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे आदींसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. दोधेश्वर नाक्यापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवतीर्थ, कचेरीरोड, देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, टिळकरोडमार्गे जाऊन सांगता दोधेश्वरनाका येथे झाली. पारंपरिक ढोलताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. तालुक्यातील युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण शहरात जयंती उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.