Headlines

अमरावती विधान परिषद निकाल:सोमवारी सकाळी 8 पासून मतमोजणी, 10 पर्यंत निकाल अपेक्षित




अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचा निकाल आज, सोमवार, २२ जून रोजी जाहीर होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणूक यंत्रणेनुसार, जर एखाद्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयाचा कोटा पूर्ण केला, तर सकाळी १० वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ४५३ मतदार होते, परंतु धारणी आणि दर्यापूर येथील प्रत्येकी एका नगरसेवकाच्या निधनामुळे ४५१ मतदारांना जिल्ह्यात सात ठिकाणी मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. १८ जून रोजी झालेल्या मतदानात ४२७ मतदारांनी आपला हक्क बजावला. ही निवडणूक मतपत्रिकेवर घेण्यात आली होती, यात ईव्हीएमचा वापर नव्हता. मतदारांना मतपत्रिकेवर १ ते ३ या क्रमाने पसंतीक्रम नोंदवायचा होता. तसेच, जर एखाद्या मतदाराला केवळ एकाच उमेदवाराला मतदान करायचे असेल, तर तो फक्त ‘१’ क्रमांक लिहून मतदान करू शकत होता. मतमोजणीनंतर कोणत्या मतदाराने कोणता पर्याय निवडला हे स्पष्ट होईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५१ मतांच्या मोजणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दोन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी महसूल विभागाचे विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या सर्वांना सकाळी ७ वाजण्यापूर्वी नियोजित ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहायक निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे आणि विवेक जाधव हे या प्रक्रियेत सहकार्य करत आहेत. विजयाचा कोटा निश्चित करण्यासाठी, मतमोजणीच्या सुरुवातीला वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील. एकूण वैध मतपत्रिकांच्या संख्येच्या निम्म्यामध्ये एक मिळवून विजयाचा कोटा निश्चित केला जाईल. जर एखाद्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच हा कोटा पूर्ण केला, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मते मोजण्याची आवश्यकता भासणार नाही. या सर्व शक्यता मतमोजणीदरम्यान स्पष्ट होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *