![]()
खंडाळा परिसरात मान्सूनच्या संथ गतीमुळे बळीराजाच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे. चालू जून महिन्याचे पहिले वीस दिवस पूर्णपणे पावसाविना कोरडे गेले असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी जूनच्या मध्यापर्यंत शेतांमध्ये पेरणीची लगबग अंतिम टप्प्यात असायची, मात्र यंदा पावसाने दगा दिल्यामुळे हजारो हेक्टरवरील शेतजमीन अद्याप ओस पडली आहे. कडक ऊन आणि वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खंडाळा परिसरातील ग्रामीण जीवन होरपळून निघाले असून, खरीप पिकांची पेरणी सुरू करणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्येच नांगरणी, वखरणी यांसह शेतीच्या मशागतीची सर्व पूर्वतयारी पूर्ण करून ठेवली होती. मात्र, मृग नक्षत्र संपत आले तरीही वरुणराजाने पाठ फिरवल्याने आता शेतकरी हताश होऊन आशेने आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वांचे लक्ष आता हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागले आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे या भागातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. विहिरी आणि बोअरवेल्स कोरड्या पडू लागल्याने पिकांना देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. परिणामी, मान्सून लवकर सक्रिय व्हावा आणि कोरड्या पडलेल्या शेतांमध्ये पुन्हा हिरवळ परतावी, या एकमेव आशेवर शेतकरी हवामानाच्या प्रत्येक अंदाजावर बारीक लक्ष ठेवून आहेत. धोका पत्करून कमी ओलावा असलेल्या जमिनीत पेरणी केल्यास बियाणे जमिनीतच सडून खराब होऊ शकते. बियांच्या उगवणीवर याचा थेट परिणाम होणार असल्याने, जोपर्यंत किमान ७५ ते १०० मिमी समाधानकारक पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाचे आहे. खरिपासाठी महागड्या बियाण्यांची खरेदी कापूस, मका, तूर, सोयाबीन, मूग आणि बाजरी यांसारख्या प्रमुख खरीप पिकांची पेरणी साधारणपणे मृग नक्षत्राच्या आगमनानंतर लगेचच सुरू होते. मात्र, वीस दिवस उलटूनही जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पारंपारिक शेतीचक्रात मोठा व्यत्यय आला आहे. यंदा चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरिपासाठी महागडी व उच्च दर्जाची बियाणे तसेच खते आधीच खरेदी करून ठेवली आहेत. यासाठी अनेकांनी विविध बँकांकडून अथवा खासगी सावकारांकडून कर्जही काढले आहे. पावसाच्या या प्रदीर्घ खंडामुळे कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
Source link
मृग नक्षत्र कोरडे:जून महिन्याचे 21 दिवस पावसाविना; खंडाळा परिसरात खरीप पेरण्या ठप्प, विहिरींच्या जलपातळीत मोठी घट