Headlines

डिक्कीत कट्टा, 6 काडतुसे घेऊन फिरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात:बुलडाणा जिल्ह्यातून विकत आणल्याची दिली कबुली‎




शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी कट्टा (पिस्तूल) आणि ६ जिवंत काडतुसांसह सोमवारी (दि. २२) अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पवन उर्फ क्षितीज सुनील लोणारे (२१, रा. चपराशीपुरा, अमरावती) असे देशी कट्ट्यासह पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरात गस्त घालत होते. त्याचवेळी गुप्त बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की, पवन उर्फ क्षितीज लोणारे हा स्वतःजवळ देशी बनावटीचा कट्टा बाळगून फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डेंटल कॉलेजकडून वडाळी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोपेडसह उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पवन लोणारे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्या मोपेडच्या डिक्कीची तपासणी केली. यावेळी पोलिसांना डिक्कीमध्ये एक देशी कट्टा आणि ६ जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हे घातक अग्नीशस्त्र आणि काडतुसे जप्त केली. त्याला ताब्यात घेतले. पवन लोणारेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आर्म्स ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३५ हजार रुपयांचा एक देशी कट्टा, ६ हजारांचे ६ जिवंत काडतूस (राऊंड), मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे व पीआय अतुल वर यांच्या नेतृत्वात एपीआय महेश इंगोले, पीएसआय गजानन सोनुने यांच्यासह पथकाने केली आहे. मोहन नगरमधील घरातून जप्त केला दारूचा साठा नवसारी परिसरातील मोहन नगर येथे विपिन रमेश बुंदेले (३८) याच्या घरी विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सोमवारी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. त्यावेळी घरातून विदेशी दारूच्या १५० बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे ३७ हजार ५०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात विपिन बुंदेले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो घरातून दारूची विक्री करत होता का, तसेच एवढा साठा कोणत्या उद्देशाने ठेवला होता, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३५ हजारांत घेतले विकत अटक करण्यात आलेल्या पवन लोणारे याच्याकडे जप्त केलेल्या शस्त्राबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने हा देशी कट्टा आणि जिवंत काडतुसे ढग्या चव्हाण (रा. निमखेडी, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) याच्याकडून ३५ हजारांत विकत आणल्याची कबुली दिली. या माहितीवरून पोलिसांनी शस्त्र पुरवठा करणाऱ्या ढग्या चव्हाण याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *