![]()
भारतीय संविधानाचे आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन झाले आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष हरिशभाई अलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनात अकोल्याच्या शिष्टमंडळाने या सोहळ्यात उपस्थिती लावली. खासदार अनुप धोत्रे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. सिंधी भाषेतील हे संविधान देवनागरी व फारशी या दोन्ही लिपित उपलब्ध करुन देण्यात आले. फाळणीनंतर विखुरलेल्या सिंधी समाजाला त्यांच्या मातृभाषेनेच एकत्र बांधून ठेवले, असे उद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात संविधानाच्या सिंधी भाषेतील आवृत्तीचे दिमाखदार सोहळ्यात विमोचन झाले. उपराष्ट्रपतींनी भाषणात सिंधी समाजाचा संघर्ष व आणि जिद्दीचा गौरव केला. फाळणीच्या वेदना सहन करणाऱ्या सिंधी समाजाला त्यांच्या मातृभाषेनेच एकत्र ठेवत त्यांची ओळख टिकवून ठेवली, असे प्रतिपादन त्यांनी केले. मातृभाषेत संविधान उपलब्ध झाल्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग आणि विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अकोल्यातील सिंधी बांधवांची उपस्थिती सोहळ्याला केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी, खासदार शंकर लालवानी आदी उपस्थित होते. अकोला सिंधी समाजबांधव सोहळ्यास उपस्थित होते. येथून माजी नगराध्यक्ष हरिश आलिमचंदानी, सिंधी जनरल पंचायतीचे अध्यक्ष रमेश जग्यासी, विनोद मनवानी, कन्हैयालाल रंगवानी, सुरेश संतानी, हरीश कटारिया, कन्हैयालाल आहुजा, कमल आलिमचंदानी, संदीप आलिमचंदानी उपस्थित होते.
Source link
देशाच्या संविधानाचे सिंधी भाषेत प्रकाशन:अकोलेकर ठरले सोहळ्याचे साक्षीदार; उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची उपस्थिती