![]()
‘स्त्री २’ या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी ‘ईठा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ऑफिशियल टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘कॉकटेल २’ चित्रपटासोबत थिएटरमध्ये हा टीझर दाखवला गेला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या चित्रपटात श्रद्धा कपूर महाराष्ट्राची शान असलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची मुख्य भूमिका साकारत आहे. ‘ईठा’ या चित्रपटाचा २ मिनिटांचा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. टीझरच्या सुरुवातीला गावोगावी गाजणाऱ्या विठाबाईंच्या तमाशाची एक भव्य झलक दिसते. विठाबाईंची लावणी पाहण्यासाठी हजारो रसिकांची अलोट गर्दी झालेली असते आणि प्रेक्षक ‘विठाबाई… विठाबाई…’ म्हणून ओरडत असतात. प्रसूतीनंतर लगेच स्टेजवर एन्ट्री, अंगावर काटा आणणारा सीन दुसरीकडे, स्टेजच्या मागे विठाबाई (श्रद्धा कपूर) पारंपरिक नऊवारी साडीत गरोदर अवस्थेत दिसते. तिला तीव्र प्रसुती कळा येत असतात. त्याच कठीण अवस्थेत ती तिथेच एका बाळाला जन्म देते, हा टीझरमधील सीन प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि अंगावर काटा आणणारा आहे. बाहेर लोक वाट पाहत असताना श्रद्धा अत्यंत जिद्दीने म्हणते, “मी अशी थांबून राहू शकत नाही, तयारी करा!” तेव्हा तिथे असलेला एक व्यक्ती म्हणतो, “अरे मर जाएगी तू…” यावर श्रद्धा कपूरचा संवाद थेट काळजाला भिडतो; ती म्हणते, “पडे पडे मरी तो बेचारी कहलाउंगी, पर नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!” यानंतर विठाबाईंच्या कलेची आणि त्यांच्या खडतर प्रवासाची एक एक वेधक झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. अजय-अतुलचे संगीत अन् दमदार स्टारकास्ट ‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या या कलाकृतीकडे सर्वांचे लक्ष आहे. या चित्रपटाला लोकप्रिय संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिले असून, टीझरमधील ढोलकीचे पार्श्वसंगीतच रसिकांना मंत्रमुग्ध करत आहे. चित्रपटात श्रद्धा कपूरसोबतच अभिनेता सिद्धार्थ जाधव, रणदीप हुडा आणि झीशान अय्युब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिनेश विजान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, सातारा आणि नाशिकच्या ग्रामीण भागात याचे चित्रीकरण पार पडले आहे. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोण होत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर? विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासातील अत्यंत दिग्गज आणि लोकप्रिय लावणी सम्राज्ञी होत्या. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एका कलावंत कुटुंबात जन्मलेल्या विठाबाईंना लोककलेचा वारसा जन्मापासूनच मिळाला होता. पुढे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव हे त्यांच्या तमाशाचे मुख्य केंद्र बनले. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि तमाशा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तमाशा क्षेत्रात असा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला कलाकार होत्या. त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना ‘विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवले जाते.
Source link
नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:'ईठा'चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत श्रद्धा कपूर