![]()
ग्रामपंचायत उंडणगाव येथे एकल महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एकल महिलांच्या समस्या, त्यांचे अधिकार व समाजातील स्थान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमामध्ये “सन्मान व हक्क, शिक्षण व कौशल्य विकास, आर्थिक स्वावलंबन व रोजगार, कायदेशीर मदत व शासकीय योजना तसेच मानसिक आधार व समाजातील सहभाग “या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसेच शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. एकल महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य सहकार्य मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान गावातील काही एकल महिलांचा त्यांच्या संघर्ष, जिद्द आणि कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक तथा सरपंच लक्ष्मण पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. जे. बोर्डे, नागेश लांडगे, राजाराम पाडळे, पंकज जैस्वाल, नसीर मुल्लाजी, संजय अक्कर, तानाजी सोनवणे, रामेश्वर अनेकर, भावराव अनेकर, गणेश पाडळे आदी पदाधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट सदस्य व अंगणवाडी सेविका व गावातील महिला उपस्थित होत्या.
Source link
उंडणगाव येथे एकल महिला दिन साजरा:महिलांच्या सन्मान, हक्क व स्वावलंबनासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन