Headlines

शेतीला पाणी देण्यावरून ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला:लोणीकंद परिसरात चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल




शेतीला पाणी देण्यावरून झालेल्या वादातून एका 61 वर्षीय ज्येष्ठावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली. या प्रकरणी जखमी जालिंदर नामदेव नागवडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांचा चुलतभाऊ सुधीर सुरसिंग नागवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाईतील शिरसवाडी येथे नागवडे कुटुंबीयांची शेतजमीन आहे. जालिंदर नागवडे हे त्यांच्या विहिरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी सुधीर नागवडे याने ‘माझ्या जागेत यायचे नाही’ असे म्हणत जालिंदर यांना शिवीगाळ केली. या वादानंतर आरोपी सुधीरने झाडाला लटकवलेली कुऱ्हाड काढून तिच्या दांड्याने जालिंदर यांना मारहाण केली. या हल्ल्यात जालिंदर यांच्या मनगटाला दुखापत झाली आहे. आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. शेवाळे करत आहेत. तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार दरम्यान, गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात भावाला शिवीगाळ केल्याच्या वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची दुसरी घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तरुणासह एका अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत सुरेश गाडे (वय 18, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओम वैद्य (वय 19) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत गाडे याने आरोपी ओम वैद्यच्या लहान भावाला शिवीगाळ केल्याने त्यांच्यात वाद झाला होता. याच कारणावरून आरोपी ओम वैद्य आणि त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदाराने अनिकेत गाडे याच्यावर शस्त्राने वार केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. शिरसाठ करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *