Headlines

पुणे विद्यापीठात मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू:तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी 15 जुलैपर्यंत ऑनलाईन प्रवेश




मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी, भाविकांच्या सोयीसाठी, तसेच पूजा-अर्चा, आरत्या आणि वर्षभरातील विविध कार्यक्रमांचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्यासाठी आता कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन, शिक्षणात नेहमीच आघाडीवर असलेल्या पुणे शहरात आता मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकता येणार आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यासाठीची प्रवेश प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आगामी १५ जुलैपर्यंत ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. मंदिर व्यवस्थापनाच्या श्रृंखलेतील हा सर्वात कमी कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केवळ तीन महिन्यांचा आहे. वाढते धार्मिक पर्यटन आणि व्यवस्थापनाची गरज लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा रोजगाराभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आलेला पूर्णकालीन अभ्यासक्रम सहा महिन्यांचा आहे. यामध्ये मंदिरांचे प्रशासन, आर्थिक नियोजन, मानव संसाधन, सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता आणि गर्दी नियंत्रणाचे शास्त्रशुद्ध धडे दिले जातील. केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवावर भर देण्यात आला आहे. विद्यापीठाने यासाठी ‘टेम्पल कनेक्ट’ संस्थेशी करार केला असून, विद्यार्थ्यांना सहापैकी तीन महिने थेट देवस्थानांमध्ये काम करून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, जेजुरी आणि नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात आपले यशस्वी प्रकल्प पूर्ण केले आहेत. सध्या देवस्थानांमध्ये व्यावसायिक आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या तरुणांना विविध देवस्थान ट्रस्ट, आश्रम, स्वयंसेवी संस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यापीठाच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे. या अभ्यासक्रमाला गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ‘वन कॅम्पस पोर्टल’वर ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज दाखल करण्याची ही प्रक्रिया गेल्या १५ जूनपासूनच सुरू झाली असून, ती तब्बल महिनाभर म्हणजे १५ जुलैपर्यंत सुरू राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *