![]()
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकली आहे. ढोरकीन, घाटनांद्रा, लोहगाव आणि खंडाळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. २४ जून रोजी कुठे भिजपाऊस, कुठे रिमझिम, तर कुठे मध्यरात्री जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील रखडलेल्या पेरण्यांना आणि पिकांना संजीवनी मिळणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, घाटनांद्रा येथील नगरखाना परिसरासह अनेक रस्त्यांवर पाणी साचले. तळ्यांचे स्वरूप आले. काही ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या पावसाने धरणीमातेला चिंब भिजवले आहे. संपूर्ण परिसरात आता शेतीकामांना वेग आला आहे. पिशोरला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जून महिन्याच्या अखेरीस पावसाने पिशोर व परिसरात हजेरी लावली. बुधवारी सकाळी दहा वाजल्यानंतर झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आले. यंदाच्या हंगामात जूनच्या सुरुवातीला अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आधीच (अद्रक), कापूस, मका पिकांची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीतीही शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत बुधवारी झालेल्या पावसाने शेतजमिनींना ओलावा मिळाला असून पिकांना जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. लोहगाव परिसरात वीजपुरवठा खंडित लोहगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीनंतर झालेल्या भिज पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात फायदा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतातील ओलावा वाढला असून पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. वाऱ्याच्या वेगाने झालेल्या पावसामुळे लोहगाव सह परिसरातील वीजपुरवठाही सकाळपर्यंत खंडित झाला होता.
Source link
ढोरकीन, घाटनांद्रा, लोहगाव, पिशोर, खंडाळा परिसरात वरुणराजाची हजेरी:पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळणार