![]()
आषाढी वारीला अवघा एक महिना बाकी असताना, त्यापूर्वी येणाऱ्या पवित्र निर्जला एकादशीच्या पावन पर्वावर पैठण येथील संतश्रेष्ठ एकनाथ महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गुरुवारी मोठी गर्दी केली होती. गुरुवार पहाटेपासूनच मराठवाड्याच्या विविध भागांतून आलेल्या जवळपास ४० हजार वारकरी आणि भक्तांनी नाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. विठ्ठल-नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. निर्जला एकादशीचे औचित्य साधून नाथ मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, नामस्मरण आणि आध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून भाविकांनी भक्तीरसाचा आनंद घेतला. भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाथ संस्थानच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले होते. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे व शहादेव लोहारे यांनी स्वतः उपस्थित राहून दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि इतर आवश्यक सुविधांवर विशेष लक्ष दिले. यामुळे हजारो भाविकांना अतिशय सुरळीतपणे दर्शन घेता आले. मंदिरात राज्यभरातून भक्त दर्शनासाठी आले आहेत. भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी संस्थानच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले. आषाढीपूर्वीची ही अत्यंत महत्त्वाची वारी असल्याने यंदा भक्तांचा ओघ असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त दर्शनासाठी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, जितुभाऊ परदेशी, बजरंग लिंबोरे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. परिसरात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता. या यात्रेमुळे व्यापारीपेठेतही तेजी पाहायला मिळाली. शहरातील आर्थिक उलाढाल वाढल्याची माहिती व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी दिली. सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा बैठकीत घेतला आढावा पालखी मार्गावरील रस्ते, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार आणि मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे उपस्थित होते. बीड, धाराशिव, अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील अपूर्ण रस्त्यांमुळे वारकऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. पारंपरिक पालखी मार्गांना अधिकृत मंजुरी देऊन तिथे पूल व भुयारी मार्ग उभारावेत, अशी मागणी केली. बैठकीस अधिकारी उपस्थित होते. ७ जुलैला पालखी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार संत एकनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला ४२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. हा सोहळा महाराष्ट्रातील सात मानाच्या पालख्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाची मानाची पालखी म्हणून ओळखला जातो. या ऐतिहासिक सोहळ्यात ४५ दिंड्या अधिकृतपणे सहभागी होतात. दरवर्षी ३५ ते ४० हजारांहून अधिक वारकरी भक्तीभावाने पंढरपूरकडे पायी वारी करतात. यंदा ७ जुलै रोजी ही पालखी पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
Source link
पैठणला 40 हजार भाविकांनी घेतले दर्शन:संत एकनाथ महाराज मंदिरात अर्धा किमी रांगा असल्याने दर्शनासाठी 20 मिनिटे