![]()
मुंबईतील लोकलमध्ये हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत भरदिवसा एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकार आणि गृह विभागाला या प्रकरणी जाब विचारला, तर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी रोशन सुवर्णाची पोलिसांसमोर कबुली : त्या रात्री मी प्रचंड दारूच्या नशेत होतो. पाऊस खूप जास्त असल्याने ट्रेनमध्ये पाणी येत होते, म्हणून मयंकने मला दरवाजा बंद करायला सांगितले. यावरून आमच्यात जोरदार वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, संतापाच्या भरात मयंकने मला पहिला ठोसा मारला. इतकेच नाही तर डब्यातील इतर सहप्रवाशांनीही मयंकचीच बाजू घेतली आणि मला बेदम मारहाण केली. दारूची नशा आणि सर्वांसमोर झालेल्या या मारहाणीमुळे माझा स्वतःवरील ताबा पूर्णपणे सुटला. मला त्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, म्हणून मी बॅगेतून धारदार चाकू बाहेर काढला आणि काही समजण्याच्या आत मयंकच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. आरोपी रोशन सुवर्णाला २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी पश्चिम रेल्वेच्या धावत्या लोकलमध्ये २३ जून रोजीच्या रात्री झालेल्या मयंक लोहार हत्याकांडाने संपूर्ण मुंबई हादरली आहे. बोरिवली जीआरपी पोलिसांनी २४ तासांच्या आत शिताफीने आरोपी रोशन सुवर्णाला बेड्या ठोकल्या. २४ जून रोजी त्याला बोरिवली न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू जप्त करण्यासाठी आणि सखोल तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला २९ जून २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २५ जून रोजी पोलिस कोठडीत झालेल्या कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत थरकाप उडवणारा खुलासा केला आहे. पोलिस प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचाही पोलिस आता तपास करत आहेत. कायदा-सुव्यवस्था राज्याचीच जबाबदारी: अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहात या विषयावर चर्चा सुरू असताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “मुंबईसारख्या शहरात रेल्वेस्थानकावर जिथे हजारो नागरिक असतात, तिथे भरदिवसा जर कुणाचा खून होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. रेल्वेचे नियंत्रण रेल्वे प्रशासनाकडे असले, तरी तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे. रेल्वे पोलिस दलात वरिष्ठ आयपीएस अधिकारी नियुक्त असतानाही अशा घटना घडत असल्याबद्दल त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गृह विभागाने येत्या सोमवारी सायंकाळपर्यंत सभागृहात सविस्तर निवेदन सादर करावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. आरोपी रोशन सुवर्णा याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी त्याला २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Source link
लोकलमधील हत्याकांड:मयंककडून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून चाकूने भोसकले- रोशन, नार्वेकरांचे शासनास निवेदन सादर करण्याचे आदेश