मुंबई8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ठेवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने यावर तीव्र आक्षेप घेतला असून चित्रपट निर्मात्यांना नाव बदलण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नेमका आक्षेप काय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. विठाबाई नारायणगावकर यांनी लावणी आणि तमाशा या लोककलेला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट येणे ही अभिमानाची गोष्ट असली, तरी चित्रपटाला ‘ईठा’ नाव देणे अयोग्य आहे. विठाबाईंच्या कलेचा सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नेटकऱ्यांकडून निर्मात्यांचे समर्थन दुसरीकडे, सोशल मीडियावरील चाहत्यांना आणि युजर्सना राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विरोध फारसा पटलेला नाही. ग्रामीण भागात आजही अनेकांचे मूळ नाव न घेता ‘ईठा’ अशीच हाक मारली जाते, असे लॉजिक नेटकऱ्यांनी मांडले. हे नाव विठाबाईंचा अनादर करणारे नसून, त्यातून मातीशी असलेला त्यांचा घट्ट ऋणानुबंध आणि गावाकडची अस्सल बोलीभाषा समोर येते, असे मत अनेक युजर्सनी व्यक्त केले आहे.
विठाबाईंचे ऐतिहासिक योगदान विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्राच्या लोककलेतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. आपल्या कलेच्या जोरावर त्यांनी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मजल मारली होती. आता श्रद्धा कपूरने या चित्रपटात त्यांची भूमिका साकारली असून, तिच्या नव्या लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा वाद निर्माण झाल्यानंतर आता चित्रपट निर्माते नाव बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक:‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमधील त्याचा लूक, देहबोली आणि संवाद पाहून प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सविस्तर वाचा