![]()
पिंपळगाव पेठ येथे कृषी विभाग व मामा ड्रोन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात परिसरातील १५० शेतकऱ्यांनी हजेरी लावली. कृषी क्षेत्रातील या क्रांतीमुळे पिंपळगाव पेठ आता आधुनिक शेतीचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे चित्र आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, उपकृषी अधिकारी परीक्षित पाटील आणि मंडळ कृषी अधिकारी संजय मोरे यांनी शासनामार्फत ड्रोन खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजना, अनुदानाची गुंतागुंतीची प्रक्रिया आणि त्यासाठीचे पात्रता निकष यावर प्रकाश टाकला. ड्रोन वापरामुळे शेतीमध्ये होणारे अमूलाग्र बदल आणि आर्थिक फायदे सांगताना अधिकारी म्हणाले की, पारंपारिक फवारणी पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यास मजुरीचा खर्च तर वाचेलच, पण औषधांचा अचूक वापर होऊन उत्पादन वाढीस मोठी मदत होईल. धीरज बोर्डे त्यांचे सहकारी शुभम कुंभार व जयकिशन तोरसकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सखोल तांत्रिक माहिती दिली. ड्रोनच्या साहाय्याने कीडनियंत्रण, बुरशीनाशक व तणनाशक फवारणी कशी केली जाते, याचे थेट प्रात्यक्षिक शेतात करून दाखवण्यात आले. यावेळी पाण्याची होणारी बचत आणि मजुरीवरील अवलंबित्व कमी होणे याबाबत शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. प्रात्यक्षिकानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. पिंपळगाव पेठ येथे ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तंत्रज्ञानामुळे शेतीच्या आधुनिकीकरणाला गती पिंपळगाव पेठ येथील शेतकरी दत्तात्रय फुले यांची कृषी विभागामार्फत ड्रोन घटकासाठी झाली आहे. त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत ४० टक्के अनुदानावर हा अत्याधुनिक कृषी ड्रोन देण्यात आला आहे. शासनाच्या अशा योजनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचत असून यामुळे शेतीचे आधुनिकीकरण वेगाने होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी सांगितले.
Source link