![]()
गेल्या १५ महिन्यांपासून निधीअभावी आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या कचाट्यात अडकलेल्या ४०० बेडच्या भव्य महिला व बाल रुग्णालयाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्चपासून रखडले होते. राज्य शासनाकडून १७४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळताच रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे, तर महिला रुग्णालयासाठी ३६० पदनिर्मितीलाही बुधवारी मंजुरी मिळाली आहे. याबाबत आरोग्य खात्याच्या वतीने बुधवारी आदेश काढण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरात ४०० बेडच्या महिला व बाल रुग्णालयाचे २७ मे २०२१ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. त्यासाठी २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ३० महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर सतत मुदतवाढ देण्यात आली. १११ कोटींची प्रशासकीय मान्यता असलेल्या रुग्णालयासाठी १८८ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र शासनाने १७४ कोटीलाच प्रशासकीय मंजुरी दिली. पदनिर्मितीला मंजुरीमुळे हॉस्पिटल लगेच सुरू होईल ४०० बेडच्या या हॉस्पिटलसाठी ३६० पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे पदे मंजूर झाल्यामुळे आता हॉस्पिटलचे बांधकाम झाल्यानंतर लगेच हॉस्पिटल सुरु करणे सोपे जाईल. याबाबत सहायक संचालक डॉ. दयानंद मोतीपवळे म्हणाले की, पदनिर्मितीमुळे गतीने हे हॉस्पिटल सुरु होईल. पदनिर्मिती झाल्यानंतर लगेच पदभरती करणे सोपे जाईल. यामध्ये वर्ग एकची १५ पदे, वर्ग दोनची २७ पदे, वर्ग तीनची गट शुश्रुषामधील १४३ पदे तर अवैद्यकीय कर्मचारी गट क मधील ४९ पदे मंजूर झाली आहेत, तर प्रशासकीय विभागातील २४ तसेच वर्ग चारची १०२ पदे मंजूर केली आहेत. करमाड प्रशिक्षण केंद्रास दिली मंजुरी सिल्लोड ग्रामीण रुग्णालय ५० खाटांऐवजी आता १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असणार आहे, तर अजिंठा ३० ऐवजी ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, सोयगाव ३० ऐवजी ५० खाटांचे रुग्णालय असणार आहे, तर करमाडला प्रशिक्षण केंद्राची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होईल.
Source link
15 महिन्यांनंतर महिला रुग्णालयाचे काम सुरू:राज्य शासनाकडून 174कोटी रुपयांच्या निधीला देण्यात आली मंजुरी