![]()
राजगडावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांची मिनी बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर थेट 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बस चालकासह अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील सुमारे 20 पर्यटकांचा एक गट मिनी बसने किल्ले राजगडावर ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी रवाना झाला होता. पहाटेच्या सुमारास ही मिनी बस पाबे घाटातून प्रवास करत होती. घाटातील एका अत्यंत तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने ही बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 25 फूट खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिक धावले मदतीला पहाटेच्या शांततेत झालेला अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक वेल्हे पोलिस आणि बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. दरीत कोसळलेल्या बसमध्ये अनेक प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडले होते. ग्रामस्थ आणि पोलिसांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. चालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक या भीषण अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चालकासह काही पर्यटकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून ते किरकोळ उपचारांनंतर धोक्याबाहेर आहेत. जेसीबीने ओढली बस अपघातानंतर खोल दरीत पडलेली मिनी बस बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला जेसीबी यंत्राची मदत घ्यावी लागली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताची नोंद केली आहे. हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास पोलिस करत आहेत. विकेंडला राजगडावर आनंदाने निघालेल्या या पर्यटकांवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण परिसरात आणि मृत पर्यटकांच्या अंधेरीतील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Source link
पाबे घाटात मिनी बसचा भीषण अपघात:मिनी बस दरीत कोसळून 2 पर्यटकांचा मृत्यू, राजगडावर चालले होते ट्रेकिंगला