Headlines

छत्रपती संभाजीनगर मनपाला 15.78 कोटींचा अत्याधुनिक वॉटर टॉवर:जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी, अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात 36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवरची भर पडली आहे. शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यापूर्वी महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणा नव्हती. ही गरज लक्षात घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 15.78 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याच निधीतून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर सेट खरेदी करण्यात आला आहे. या संचामध्ये 36 मीटर उंचीचा वॉटर टॉवर, 14,000 लिटर क्षमतेचा वॉटर बाउजर आणि अग्निशमनासाठी उपयुक्त रोबोटचा समावेश आहे. ही यंत्रणा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून, ती नामांकित जर्मन कंपनी ‘स्विंग’ने तयार केली आहे. भारतातील अधिकृत प्रतिनिधी मे. निधी एंटरप्रायझेस, मुंबई यांच्यामार्फत या मशीनरीचा पुरवठा करण्यात आला आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा 10 ते 12 मजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यास सक्षम आहे. वॉटर टॉवरच्या बूमवर बसवलेल्या मॉनिटरिंग कॅमेरा आणि फायबर ऑप्टिक प्रणालीमुळे आगीचे अचूक निरीक्षण करता येते. तसेच, थर्मल कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाहनाच्या कंट्रोल पॅनेलमधून ऑपरेटरला तळमजल्यापासूनच आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे, ज्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आगीजवळ जाण्याचा धोका टाळता येईल. यंत्रणेमध्ये समाविष्ट असलेल्या रोबोटच्या साहाय्याने आग विझवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि जलदगतीने पार पाडता येणार आहे. बाउजरद्वारे सतत पाणीपुरवठा सुनिश्चित केला जात असल्याने आग विझवण्याची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. सदर यंत्रणा नुकतीच महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. लोकार्पणानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिल्यावर या मशीनरीचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात येणार आहे. या नव्या यंत्रणेच्या समावेशामुळे शहरातील अग्निशमन सेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि परिणामकारक होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *