![]()
उपराजधानीतील प्रसिद्ध ‘न्यू एरा’ रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला तब्बल 20 लाख 15 हजार 290 रुपयांचा औषधसाठा पथकाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एफडीएच्या नागपूर पथकाला ‘न्यू एरा’ हॉस्पिटलच्या फार्मसीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, लकडगंज येथील टेलिफोन एक्सचेंज चौकात असलेल्या या रुग्णालयातील मेडिकल स्टोअरची अचानक तपासणी करण्यात आली. औषधसाठ्याच्या पडताळणीत मोठी तफावत आढळून आली. अधिक चौकशीत, रुग्णालयाच्या बेसमेंटमधील एका खोलीत परवान्याशिवाय आणि वैध कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणावर औषधे लपवून ठेवल्याचे उघड झाले. या कारवाईदरम्यान रुग्णालयाच्या आणखी एका गंभीर मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला. डॉक्टर रुग्णांना लिहिलेली औषधांची मूळ प्रिस्क्रिप्शन नातेवाईकांच्या हातात न देता, ती थेट संगणकीय प्रणालीद्वारे रुग्णालयाच्या स्वतःच्याच मेडिकल स्टोअरला पाठवत होते. यामुळे रुग्णांना बाहेरून स्वस्त दरात औषधे खरेदी करण्याचा पर्यायच उरत नव्हता. एफडीए आयुक्तांनी 12 जून 2026 रोजी ‘रुग्णालयातील दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती नाही’ असा फलक लावण्याचा स्पष्ट आदेश दिला असतानाही, रुग्णालयाने तो लावला नव्हता.
तपासणीत इतरही अनेक गंभीर त्रुटी आणि नियमबाह्य गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये नामफलकावर ‘केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ असा उल्लेख नसणे, मुदतबाह्य औषधे स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसणे, संवेदनशील ‘शेड्यूल्ड-1’ औषधांच्या खरेदी-विक्रीच्या साठ्यात तफावत असणे आणि तपासणी पुस्तक नमुना 35 उपलब्ध नसणे यांचा समावेश आहे. पथकाने दोन औषधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
या सर्व प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासनाने ‘न्यू एरा’ हॉस्पिटलच्या संबंधित संस्थेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत पुढील कडक कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे.
Source link