Headlines

तापत्या उन्हातही शंभरावर दात्यांनी दिले रक्त:परशुराम जयंतीनिमित्त गौमातेची होणार रक्ततुला, माहेश्वरी समाजाचा उपक्रम




अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. या उपक्रमासाठी गेल्या आठवडाभरापासून विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. याच श्रृंखलेतील एक शिबिर रविवार, १२ एप्रिल रोजी धनराज लेन येथील माहेश्वरी भवनात पार पडले. कडक उन्हातही या शिबिरात शंभराहून अधिक नागरिकांनी रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. येथील माहेश्वरी पंचायत, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री गोरक्षण संस्था आणि श्री रामचरित मानस परिषद यांनी संयुक्तपणे ‘गौमाता सन्मान संवर्धन समिती’ची स्थापना केली आहे. या समितीमार्फत गौमातेची रक्ततुला केली जाईल. हा मुख्य कार्यक्रम गोरक्षण संस्थेत सकाळी ९ वाजता सुरू होईल. आजच्या रक्तदान शिबिरात रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) या दोन्ही रक्तपेढ्यांनी सहकार्य केले. रक्तदान समितीचे अध्यक्ष आणि शतकवीर रक्तदाता महेंद्र भुतडा, तसेच अजय दातेराव, श्याम शर्मा, प्रा. ठाकूर, रितेश व्यास, युसुफभाई बारामतीवाला यांसारखे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रक्ततुलेच्या कार्यक्रमासोबतच अनेक पूरक उपक्रमही राबवले जात आहेत. यामध्ये हनुमान चालीसा पाठ, महाआरती, सामूहिक सुंदरकांड पाठ, गौचारा अर्पण, सामूहिक बावन्नी पाठ आणि वृद्धाश्रमात भोजनदान यांचा समावेश आहे. समितीचे सहसंयोजक सुरेश साबू आणि अशोक जाजू यांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. त्यानुसार, १३ एप्रिल रोजी माहेश्वरी भवनच्या राधाकृष्ण मंदिरात महाआरती, १४ एप्रिलला गोरक्षण संस्थेत सुंदरकांड, १५ एप्रिलला भगवान परशुराम गोरक्षणमध्ये गौचारा अर्पण, १६ एप्रिलला गजानन महाराज मंदिरात बावन्नी पाठ, १७ एप्रिलला जेवडनगरच्या वृद्धाश्रमात भोजनदान, १८ एप्रिलला शोभायात्रा व रक्ततुलेसंबंधी बैठक आणि १९ एप्रिल रोजी प्रत्यक्ष रक्ततुला व भगवान परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *