![]()
ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेल्या पैठण शहरातील शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात सर्रास सुरू असलेल्या देशी-विदेशी मद्यविक्रीच्या दुकानांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मद्यविक्री केंद्रांसमोर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत उघडपणे चालणारे मद्यप्राशन, मद्यप्यांचा आरडाओरडा, वाहनांची बेशिस्त पार्किंग आणि हुल्लडबाजीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी, परिसरातील महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या वाढत्या त्रासामुळे शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने तात्काळ शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावीत, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. शहरातील संत एकनाथ महाराज मंदिर रस्ता यांसह इतर प्रमुख मार्गांवर देशी व विदेशी मद्यविक्रीची दुकाने आहेत. या दुकानांच्या परिसरात पहाटेपासूनच मद्यप्यांची गर्दी जमू लागते. अनेक ठिकाणी तर या दुकानांच्या बाहेरच असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांभोवती उघड मद्यपान सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे या परिसरात नियमितपणे गोंधळ, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, आपापसातील भांडणे आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून दैनंदिन वावर करणे अत्यंत असुरक्षित व कठीण झाले आहे. या परिसरातून अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज ये-जा करावी लागते. या मार्गाने जाताना मद्यप्यांच्या टोळक्यांमुळे विद्यार्थिनींना अनेकदा अत्यंत अवघड आणि मानहानीकारक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच, शालेय वयाच्या मुलांच्या मनावरही या दूषित सामाजिक वातावरणाचा अत्यंत विपरीत व घातक परिणाम होत असल्याची चिंता शहरातील पालकांनी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक मद्यविक्री केंद्रांवर प्रशासनाने दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन होते की नाही, याची कोणतीही नियमित तपासणी केली जात नाही. दुकानांसमोर सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करून मद्यप्राशन होत असतानाही स्थानिक प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यक्षमतेबाबत आणि भूमिकेबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पैठण शहराच्या बाहेरच दुकाने असावीत ः सूरज लोळगे पैठण शहरातील धार्मिक स्थळे आणि शाळांच्या परिसरात दारूची दुकाने असणे दुर्दैवी आहे. हे दुकाने हटवण्यासाठी प्रशासनाने नव्याने विशेष मोहीम सुरू करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर नियमितपणे कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि ही दुकाने शहराच्या बाहेर हलवली पाहिजेत असे महिला सुरेखा म्हस्के यांनी सांगितले. तर शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि दाट लोकवस्तीतील सर्व मद्यविक्रीची दुकाने कोणत्याही परिस्थितीत शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावीत. दुकानांसमोर होणारे सार्वजनिक मद्यप्राशन तातडीने बंद करून प्रशासनाने तिथे नियमित तपासणी करावी. तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी सांगितले.
Source link
पैठणमध्ये शाळेलगत देशी-विदेशी दारूची दुकाने:शालेय विद्यार्थी, भाविकांना त्रास; मद्यविक्रीची दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी