![]()
.
इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील ‘आप्पांचे पत्र’ हा पाठ विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजावा आणि पत्रलेखनाचे महत्त्व पटावे, यासाठी नाशिकचे साहित्यिक व सूत्रसंचालक दत्ता कोठावदे यांनी जानकाई विद्यालयात पोस्टमनचा पोशाख परिधान करून सायकलवरून आगमन करत पाठाचे भावपूर्ण व नाट्यपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
पोस्टमनच्या भूमिकेतून ‘आप्पांचे पत्र’ वाचताना त्यांनी आवाजातील चढ-उतार, भावनिक अभिव्यक्ती आणि प्रभावी वाचनशैलीचा वापर केला. त्यामुळे पाठातील आशय विद्यार्थ्यांपर्यंत जिवंतपणे पोहोचला. विद्यार्थ्यांना केवळ पाठाचे आकलन झाले नाही, तर पत्रलेखनातील भावना, संवादाचे महत्त्व आणि पारंपरिक पत्रव्यवहाराचे मूल्यही समजले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली असून अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः पत्र लिहिण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यालयातील शिक्षकांनीही दत्ता कोठावदे यांच्या अभिनव सादरीकरणाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
पत्रलेखन उपक्रमाचे आयोजन शिक्षक आर. एस. अमृतकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी शिक्षक आर. आर. सोनवणे यांनी विद्यालयातील विद्यार्थी, स्वरचित कवी तसेच मराठी भाषेची अभिरुची जपणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पूर्वी साबळे आणि सिद्धेश्वरी गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेच्या मार्गदर्शिका उषा कोठावदे, संध्या कोठावदे, मुख्याध्यापक एम. बी. जोशी, शिक्षक व्ही. जी. जाधव, व्ही. ए. कोतवाल तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या उपक्रमामुळे ‘आप्पांचे पत्र’ हा पाठ विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा घर करून गेला.