![]()
मुंबईहून आलेल्या मित्राला भेटल्यानंतर टोळके दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी रॅप साँग कोण चांगला गातो यावरून त्यांच्यात वाद झाला आणि दोन गट पडले. वादानंतर तेथून सर्वजण पांगले. मात्र डोक्यात राग गेलेल्या टोळक्याने दुसऱ्या गटाला रस्त्यात गाठून चाकू, दगड, विटांनी मारहाण केली. यात शेखर ऊर्फ पिया देविदास लहाने (२२,रा. इटखेडा) याचा मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन परिसरातील राजूनगर भागात २७ जूनच्या रात्री ११ ते १२.४५ या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली, अशी माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. मृतासह अन्य दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा : यात किसन रमेश गुप्ते (४५, रा. राजीवनगर) यांच्या फिर्यादीवरून मृत शेखर लहाने, श्रीजत आदमाने आणि प्रथमेश जंगले (सर्व रा. इटखेडा) या तिघांविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. श्रीजत आणि प्रथमेशला अटक केली असून त्यांनादेखील ४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. रात्री ११ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंतचा घटनाक्रम
रात्री ११:०० वा. : अजयला भेटण्यासाठी शेखर, श्रीजत व प्रथमेश अनिरुद्धच्या घरी गेले व तिथे दारूची पार्टी सुरू झाली. मध्यरात्री १२:४५ वा. : ‘रॅप साँग’च्या वादातून श्रीजत व अनिरुद्धमध्ये हातापायी झाली आणि सर्वजण रस्त्यावर आले.
रस्त्यावरील थरार : इम्रानने श्रीजतवर चाकूने वार केला, पावसात श्रीजत घसरून पडताच त्याला चौघांनी बेदम मारहाण केली.
हल्ला व मृत्यू : श्रीजतला वाचवायला गेलेल्या शेखरला घेरून चाकू, वीट आणि सिमेंटचा गट्टू मारून त्याची निर्घृण हत्या केली. इनसाइड स्टोरी: नशेतून हत्याकांडाचा थरार, जीव टांगणीला
शहरात रात्रीच्या वेळी नशेतून होणाऱ्या गुन्हेगारीत चिंताजनक वाढ झाली आहे. अवघ्या महिनाभरात दारूच्या नशेतून झालेला हा दुसरा खून आहे. यापूर्वी ३१ मेच्या रात्री सिडको भागात एकाची हत्या करण्यात आली होती, तर आता राजीवनगर भागात रॅप साँगच्या किरकोळ कारणावरून तरुणाला जीव गमवावा लागला. किरकोळ वादांचे पर्यवसान थेट खुनात होत असल्याने रात्रीची गस्त आणि अवैध दारूविक्रीवर पोलिसांचे नियंत्रण उरले आहे का, असा गंभीर प्रश्न लागोपाठ घटनामुळे उपस्थित झाला आहे.
Source link
नशेतून हत्याकांडाचा थरार:रॅप साँग गाण्यावरून संभाजीनगरात टोळक्याकडून तरुणाची हत्या, भाऊ गंभीर जखमी; भररस्त्यात चाकू, दगड, विटांनी मारहाण