Headlines

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण: भू-संपादनासाठी कोट्यवधींची तरतूद:पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत




पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी भू-संपादनाकरिता राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. सध्या कात्रज-कोंढवा मार्गावर दर तासाला १५ हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असते, ज्यात अवजड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. पीएमआर रिंग रोड आणि कात्रज-खडी मशीन-वडकी बायपास मार्ग उपलब्ध नसल्यामुळे बोपदेव घाट व दिवे घाटमार्गे येणारी वाहनेही याच रस्त्याचा वापर करतात. वाढता निवासी व व्यावसायिक विकास तसेच गोदामांच्या वाढीमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर, ८४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता जून २०२६ पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण ३.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौरस मीटर क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे. यासाठी प्रत्यक्ष जागेवर बॉण्ड्री मार्किंग आणि झाडांची मोजणी यांसारखी प्राथमिक कामे सुरू झाली आहेत. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सुमारे १४० कोटी रुपये, तर पुणे महानगरपालिकेकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ८५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूदही करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रकल्पाला आवश्यक आर्थिक बळ मिळाले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती भू-संपादन प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेत आहे. अंतिम निवाडा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. ५० मीटर रुंदीच्या पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ता, सर्विस रस्ते, पावसाळी वाहिन्या (यू-ड्रेन) आणि माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. अंतिम ८४ मीटर रुंदीच्या आराखड्यात फूटपाथ, सायकल ट्रॅक, पार्किंग, युटिलिटी डक्ट आणि मलवाहिनी यांसारख्या सुविधांचाही समावेश असेल. दरम्यान, राजस चौक येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्याचे कामही सुरू आहे. यापैकी काही भाग पूर्ण झाला असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, “कात्रज-कोंढवा रस्ता हा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भू-संपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन समन्वयाने काम करत आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवास करता येईल.” सध्या या प्रकल्पाचे सुमारे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. महापालिका आणि शासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या प्रकल्पामुळे भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *