Headlines

अजिंठा लेणी येथे ‘ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व’ प्रदर्शन:म्युझियम ऑन व्हील्स उपक्रमाला पर्यटकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद‎




मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने सुरू केलेल्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी ‘ऐतिहासिक संबंध: भारत आणि प्राचीन विश्व’ या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या फिरत्या संग्रहालयाला देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक इतिहासाची माहिती घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटकांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मुंबई वस्तुसंग्रहालयाचे आभार मानले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर इजिप्शियन लिपीची ओळख आणि सन १४३० मधील जर्मनीचे प्रसिद्ध इंटाग्लिओ प्रिंटिंग तंत्र स्वतः करून पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली. या वेळी अजिंठा लेणीचे संरक्षण सहायक मनोज पवार, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बी. मोठे, प्रबंधक महादेव हिरवे, एम.टी.डी.सी.चे प्रबंधक राज पाटील आणि पोलिस कर्मचारी भारत कोळी आदींनी प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले. पर्यटन आणि सांस्कृतिक जनजागृतीसाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरत असून, सर्व स्तरांतून या प्रवासाचे स्वागत होत आहे. वातानुकूलित बसमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची गॅलरी हा संपूर्ण उपक्रम एका अद्ययावत वातानुकूलित बसमध्ये साकारण्यात आला आहे. बस चालत असताना आतील वस्तू किंवा माहिती फलक पडू नयेत म्हणून विशेष तांत्रिक रचना करण्यात आली आहे. या संग्रहालयात जगातील चार महान व प्राचीन संस्कृतींचे दर्शन घडवले गेले आहे. यामध्ये भारताची वैभवशाली हडप्पा व मोहेंजोदडो संस्कृती, सुमारे ९ हजार वर्षे जुनी मेसोपोटेमियन संस्कृती, ५ ते साडेपाच हजार वर्षे जुनी रहस्यमय इजिप्शियन संस्कृती आणि चिनी संस्कृती या चार प्रमुख संस्कृतींचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *