![]()
हटके म्युझिक ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांनी गीतरामायणातील २० गीतांचे ११० मिनिटे सलग शीळेवर (हनुमान ध्वनीवर) सादरीकरण करून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये विश्वविक्रम नोंदवला आहे. या विक्रमाबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील गीतांचे शीळेद्वारे सादरीकरण करण्याचा हा विक्रम आहे. कुलकर्णी यांनी कराओके ट्रॅकवर ही २० गीते सलग ११० मिनिटे सादर केली. या विश्वविक्रम सन्मान सोहळ्याचे आणि विशेष हनुमान ध्वनी (शीळ) गीतरामायण मैफलीचे आयोजन सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळाच्या राजवाडे हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी संगीतप्रेमी अनिल मोटे, विवेक सिन्नरकर, तानसेन चौधरी, शैलेंद्र गोस्वामी, शिरीष कुलकर्णी आणि सुमेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने शिरीष कुलकर्णी यांच्या या विक्रमाची दखल घेत ‘लाँगेस्ट कंटीन्यूअस विसलिंग परफॉर्मन्स ऑफ गीत रामायण सॉंग्स ऑन कराओके ट्रॅक’ या नावाने अधिकृत मान्यता दिली. सन्मान सोहळ्यात त्यांना विश्वविक्रमाचे सन्मानपत्र आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना अनिल मोटे म्हणाले की, हटके ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन पद्धतीने गीतरामायण सादरीकरण होत आहे आणि शिरीष कुलकर्णी हे कार्य अत्यंत हिरीरीने पुढे नेत आहेत. सुमेधा कुलकर्णी यांनी गीतरामायण शिकणे आणि सादर करणे ही एक वेगळीच अनुभूती असल्याचे सांगितले. विवेक सिन्नरकर यांनी गीतरामायणाला सांस्कृतिक ठेवा आणि संगीतपीठ संबोधले. रामायणात काय सांगितले आहे, हे या गीतांमधून समजते आणि आपल्या स्वतःमधील संघर्षावर रामायण उत्तर देते, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
शिळेवरील गीतरामायणाचा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये नोंद:110 मिनिटांचे सादरीकरण, हटके ग्रुपचे शिरीष कुलकर्णी यांचा सन्मान