Headlines

भारतीय दर्शनशास्त्रातील विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारा:नीलेश ओक यांचे 'डायनॅमिक भारत 2047' व्याख्यानात प्रतिपादन




प्राचीन भारतीय इतिहास संशोधक नीलेश ओक यांनी भारतीय दर्शनशास्त्रातील वैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. ‘डायनॅमिक भारत २०४७’ हे स्वप्न साकार करण्यासाठी ही दृष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पाश्चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण सोडून प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागरीक सोशल फाऊंडेशनने ॲम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘डायनॅमिक भारत २०४७’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना ओक यांनी हे विचार मांडले. या कार्यक्रमाला ॲम्बिशन्सचे संचालक कौस्तुभ अत्रे, वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे, फाऊंडेशनचे विश्वस्त अमेय सप्रे, संचालक प्रीतम थोरवे आणि चंद्रशेखर यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ओक यांनी भारतीय उपखंडाचा प्राचीनतम इतिहास आणि कालखंडाच्या नेमकेपणावर सविस्तर मांडणी केली. गतानुगतिक वृत्तीचा त्याग करून, स्वतः अभ्यास करून, पुराव्यांची पडताळणी करून, प्रसंगी पुराव्यांचा शोध घेऊन आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची पुनर्मांडणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वेद, उपनिषदे, दर्शने आणि महाकाव्यांतून मिळणारे खगोलशास्त्रीय पुरावे, त्यातील नेमकेपणा, प्रगत नौकानयन आणि समृद्ध कृषी क्षेत्र यातून प्राचीन भारतीय उपखंडाची समृद्धी अधोरेखित होते, असे ओक म्हणाले. वेदांमधील नोंदी, रामायण-महाभारतातील खगोलशास्त्रीय पुरावे आणि नक्षत्रांचे संदर्भ तपासल्यास महाभारत युद्धाचा काळ इसवीसनपूर्व ५५६१ आणि राम-रावण युद्धाचा काळ १२ ते १४ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे सिद्ध होते, असे त्यांनी नमूद केले. वाल्मिकी रामायणातील उल्लेखानुसार, तत्कालीन भारतीयांना अंटार्क्टिका, आर्क्टिक प्रदेश, आल्प्स आणि अँडीज पर्वतरांगांची नेमकी माहिती होती, हे स्पष्ट होते. ज्ञानसाधनेसाठी बुद्धिनिष्ठ संशय, सात्विक श्रद्धा आणि प्रयोजन असलेली जिज्ञासा आवश्यक आहे. आधुनिक काळात जागतिक पातळीवर संशोधनात योगदान देण्यासाठी तरुणाईने गीता, ज्ञानेश्वरीसह भारतीय दर्शनशास्त्रांचा अभ्यास करावा, असे आवाहन ओक यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *