Headlines

महादेव मंदिरात पहाटे महापूजा, रुद्राभिषेक:पहिला सोमवार, नागपंचमी एकाच दिवशी; दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन‎




यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. हा योग तब्बल ३० वर्षांनंतर आल्याचे समजते. या मंगल पर्वावर शहरातील १२ ज्योर्तिलिंग मंदिरात पहाटे ५.३० वाजता विशेष महापूजा आणि रुद्राभिषेक करण्यात आला. पहाटेच्या अभिषेकादरम्यान भगवान शिवशंकरांना दूध, दही, तूप, मध आणि साखर म्हणजेच पंचामृतासह बेलपत्र अर्पण करत मनोभावे आराधना करण्यात आली. अभिषेक विधी संपन्न झाल्यानंतर सकाळी सहा वाजता मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच मंदिरात हर हर महादेवाच्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच सायंकाळी ६.३० ते आठ वाजेदरम्यान मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम संपूर्ण श्रावण महिन्यात नियमितपणे सुरू राहणार आहे, असे पुजारी संपूर्णानंद मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील विविध शिव मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. ^यंदा पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आला. भगवान शिवशंकरांच्या गळ्यात व सानिध्यात नेहमीच नागदेवता विराजमान असतात. त्यामुळे या दिवशी शंकराच्या उपासनेसोबतच नागदेवतेच्या पूजेलाही अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हा विशेष शिव-नाग योग सर्व भाविकांच्या जीवनात सुख, समृद्धी व कल्याण आणणारा ठरेल. – संपूर्णानंद मिश्रा, पुजारी. राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच रांगा शहरातील राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मांदियाळी दिसून आली. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला शिवालयांमध्ये भगवान शिवशंकराचे दर्शन घेऊन बेलपत्र अर्पण करत पूजन करत होत्या. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त सकाळपासून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *