![]()
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी (वय ८०) यांचे रविवारी (दि. १२) रात्री ८ वाजता वाई येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मेंदूतील पक्षाघातामुळे (ब्रेन स्ट्रोक) त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सोमवारी सकाळी ९ वाजता वाई येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वासुदेव जोशी यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू व प्रसिद्ध शास्त्रज्ञ कै. मधुकर लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे अमेरिकेत राहून काही काळ शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी पुणे येथील किर्लोस्कर कंपनीच्या संगणकीय विभागात कनिष्ठ संशोधक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तर्कतीर्थांचे मराठी विश्वकोशातील स्वीय सहायक राम कोल्हटकर यांच्या निधनानंतर वासुदेव जोशी यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. २००४ मध्ये ते या सेवेतून निवृत्त झाले. केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणूनही मोलाचे योगदान दिले होते. सध्या ते वाई येथील प्रतिष्ठित ‘प्राज्ञपाठशाळामंडळा’च्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या निधनाने वाई परिसरातील शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात बहीण मालती कुलकर्णी (अमेरिका), मुलगी गीता, जावई अभय आढे व नातू अर्जुन असा परिवार आहे.
Source link
तर्कतीर्थांचे चिरंजीव वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन:वाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; मराठी विश्वकोश मंडळाचे होते माजी सदस्य