Headlines

अशोक खरातचे जेवण झाले कमी:तासनतास एकांतवासात राहतो बसून, पत्नी कुठे विचारले तर म्हणाला- 'ते देवालाच माहीत'




स्वतःला ‘दैवी अवतार’ म्हणवून घेत शेकडो भाविकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात आता पोलिस कोठडीत पुरता हबकला आहे. सुरुवातीला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच ‘तुमच्यावर देवाचा कोप होईल’ अशा धमक्या देणारा आणि त्यांचे भविष्य सांगण्याचा अचरट प्रयत्न करणारा खरात आता कमालीचा नरम झाला आहे. पोलिस कोठडीचा फास जसजसा आवळला जात आहे, तसतसा त्याचा तोरा उतरला असून, आपल्या पापांचा पाढा आता वाचला जाणार याची जाणीव झाल्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. विशेष तपास पथक आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून सुरू असलेल्या सखोल चौकशीमुळे खरातची बोलती आता पूर्णपणे बंद झाली आहे. या गंभीर गुन्ह्यातून आणि तपास यंत्रणांच्या चक्रातून आपण सहजासहजी सुटणार नाही, याची पक्की खात्री पटल्याने तो स्वतःच्या भविष्याबद्दल प्रचंड चिंतेत आहे. कोठडीत असताना कधीकाळी पोलिसांवर रुबाब गाजवणारा हा भोंदू आता पूर्णपणे जमिनीवर आला असून, त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक खरातचे जेवण झाले कमी पोलिस कोठडीत अशोक खरात आता कमालीचा शांत झाला असून तपासादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना तो अत्यंत त्रोटक उत्तरे देत आहे. सततच्या चिंतेमुळे त्याचे जेवणही कमी झाले असून तो तासनतास एकांतवासात बसून असतो. बाहेर पडल्यानंतर लोकांच्या तीव्र संतापाला आणि रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने खरात पुरता धास्तावला असून, न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेच व्हावी, अशी विनवणी तो वारंवार पोलिस अधिकाऱ्यांकडे करत असल्याची माहिती आहे. पत्नी कल्पना खरात कुठे ते देवालाच माहीत अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अद्याप फरार असून तिच्या ठावठिकाण्याबद्दल विचारले असता, ‘ते देवालाच माहीत’ असे म्हणत खरातने हात झटकले आहेत. मात्र, त्याच वेळी तो आपला मुलगा हर्षवर्धन याच्यासाठी प्रचंड व्याकुळ झाला असून ‘मला माझ्या मुलाची काळजी वाटते, एकदा त्याच्याशी फोनवर बोलू द्या,’ अशी विनवणी तो पोलिस अधिकाऱ्यांकडे करत आहे. आज न्यायालयात करणार हजर दरम्यान, भोंदू अशोक खरात याच्या तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत आज (दि. 13) संपत असल्याने त्याला पुन्हा नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात एसआयटी आता चौथ्या गुन्ह्यासाठी त्याची पोलिस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करणार असून, आतापर्यंत झालेल्या तपासाचा सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव खरातला ऑनलाइन पद्धतीने न्यायालयात हजर केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *