Headlines

महापुरुषांची समतेची संकल्पना ही सामाजिक न्यायाचा पाया -डॉ. गजभिये:विद्यापीठात व्याख्यान, समाजाने सजक असावे असे मान्यवरांचे सूर उमटले‎




प्रतिनिधी | अमरावती तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मांडलेली समतेची संकल्पना केवळ राजकीय हक्कांपुरती मर्यादित नसून ती मानवी मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे, असे मौलिक विचार कमलाताई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार येथील डॉ. ओमराज गजभिये यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने समता सप्ताह समारोह-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘महात्मा फुले यांचा समतावादी दृष्टीकोन’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ. मनिषा कोडापे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. विषयाची मांडणी करतांना डॉ. गजभिये म्हणाले, आजच्या काळात मानवी मूल्यांना छेद देण्याचे प्रयत्न होत असताना, समाजाने सजग झाले पाहिजे. भिडे वाड्यात सुरू झालेली पहिली शाळा ही केवळ शिक्षणाची सुरुवात नव्हती, तर ती हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून स्त्रियांना मुक्त करणारी एक मोठी क्रांती होती. महात्मा फुलेंनी केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच नव्हे, तर कार्ल मार्क्स यांच्या विचारांच्या धर्तीवर कामगारांच्या हक्कासाठीही लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या समतेच्या विचाराला कायदेशीर अधिष्ठान मिळवून दिले. आज आपण आपल्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल जागृत झालो नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अंधकारमय होईल, असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व मेणबत्ती प्रज्वलन करून विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. शाल, श्रीफळ व पुस्तक देवून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. पंडित भोयर यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा डॉ. ओमराज गजभिये यांनी सत्कार केला. प्रास्ताविकात डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजानामागील भूमिका स्पष्ट केली व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन वर्षा लोणारे यांनी, तर आभार प्रा. कल्पना पाटील यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला डॉ. प्रेमानंद तिडके, उपकुलसचिव राहुल नरवाडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, अॅड. अरुण रौराळे, तसेच विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. व्यापक मानसिक परिवर्तन, प्रबोधनाची गरज : डॉ. कोडापे प्रमुख अतिथी डॉ. मनिषा कोडापे म्हणाल्या, स्त्री शिक्षणाचा पाया फुले दाम्पत्यांनी रचला आणि प्रचंड विरोध पत्करून स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहेत, असे असले तरी व्यापक मानसिक परिवर्तन आणि प्रबोधनाची गरज आहे. केवळ घोषणांनी नव्हे, तर महात्मा फुलेंनी दिलेल्या समतेच्या विचारानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मानसिक दृष्टिकोन बदलणे हेच या व्याख्यानाचे उद्दिष्ट आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *