![]()
प्रतिनिधी | अकोला “चला पुन्हा एकदा जगूया, बालपणाचे ते सोनेरी दिवस!’ या भावनिक हाकेला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कावसा येथे माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध पुन्हा दृढ केले. माजी विद्यार्थी गजानन हरणे म्हणाले की, या माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालना मिळत असून त्यांच्या सहकारामुळे मोठा विकास, बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा मेळाव्याची आज गरज आहे. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरला टेकाडे होत्या. उद्घाटन अकोटचे गटशिक्षणाधिकारी मधुकरराव सूर्यवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच डॉ. शिवदास बुटे, उपसरपंच पांडुरंग वानखडे, गजानन सावरकर, विस्तार अधिकारी साधना वाघोडे, अनंत नहाटे, निशिकांत भुरे, साधना बापोडे, निशिकांत भुरे केंद्रप्रमुख, गटसमन्वयक सुधाकर जायले, राजकुमार वानखडे, विठ्ठल दामोदर, संजय दामोदर, राम चिंचोळकर, पोलिस पाटील नीलकंठ सावरकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल तळी, ग्रामसेवक यश देशमुख, मोहन सावरकर, सुनीता दामोदर, प्रल्हाद भोयर, उंबरकर आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांच्या भावना दाटून आल्या. बालपणीचे निरागस क्षण, वर्गातील गमतीजमती, खेळाचे मैदान, शाळेतील संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा उल्लेख करत उपस्थितांनी भूतकाळाचा जणू जिवंत अनुभव घेतला. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या मित्रांसोबत गप्पा, हास्यविनोद आणि आठवणींचा खजिना उलगडत वातावरण अत्यंत आनंदमय झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप सावरकर यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर महाजन, सोनू जाधव तर आभार संतोष पवार यांनी मानले. शाळेला दिले साहित्य माजी विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वस्तू रुपात व पैशाच्या रूपात देणगी दिल्या. माजी विद्यार्थी गजानन हरणे, पोलिस निरीक्षक मनोहर वानखडे, अनंत खेडकर, प्रशांत शेवतकर, सविता काकड, सुरेश बुटे, कविता शेगोकार, अजय घनबहादूर आदींनी मनोगत व्यक्त केले.
Source link
विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालना:माजी विद्यार्थी गजानन हरणे