![]()
विकासाच्या वेगात वन्यजीवांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर केवळ संवर्धनाच्या घोषणा करून चालणार नाही. संशोधन, शास्त्रीय नियोजन आणि प्रत्यक्ष कृतीतून विकास व निसर्ग यांचा समतोल साधावा लागेल, हा संदेश ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ने चार लघुपटांच्या माध्यमातून दिला. ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये आयोजित ‘अनदर वे : फ्रॉम स्टोरीज टू सोल्युशन्स’ या लघुपट प्रदर्शन आणि परिसंवादात १४० हून अधिक चित्रपट निर्माते, पर्यावरण संशोधक आणि नागरिक सहभागी झाले. भारताची आर्थिक प्रगती होत असताना पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल, यावर या लघुपटांतून प्रकाश टाकण्यात आला. वन्यजीवांचे अस्तित्व, शहरीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार, अन्नसुरक्षा आणि स्थानिक समुदायांच्या उपजीविकेचा परस्परसंबंधही यातून मांडण्यात आला. समुद्री गाय ते फ्लेमिंगो; चार कथा, वेगवेगळी आव्हाने आकांक्षा सूद सिंग दिग्दर्शित ‘पानी सुअर’ हा लघुपट अंदमान-निकोबार बेटांवरील दुर्मीळ डुगॉन्ग अर्थात समुद्री गायीच्या संवर्धनाची कथा सांगतो. हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक समुदायांच्या सहभागातून उभारलेल्या निरीक्षण व्यवस्थेचे महत्त्व यात अधोरेखित केले आहे. ‘फ्लेमिंगो’ हा लघुपट दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ग्रेटर फ्लेमिंगोच्या अधिवासाचा वेध घेतो. शहरीकरण, अधिवासावरील अतिक्रमण आणि हवामान बदलाच्या काळात शहरांमध्येही वन्यजीवांसाठी जागा राखण्याची गरज यातून मांडली आहे. विजय बेदी दिग्दर्शित आणि बहार दत्त यांनी सूत्रसंचालन केलेला ‘ब्रिजिंग द गॅप’ हा लघुपट विकासकामे आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षावर भाष्य करतो. हत्तींसाठी भूयारी मार्ग आणि माळढोक पक्ष्यांसाठी सुरक्षित वीजवाहिन्या यांसारख्या उपायांतून विकास व संवर्धनाचा समतोल साधता येऊ शकतो, हे यात दाखवले आहे. ‘सिकिंग सार्डिन्स’ या लघुपटात इंडियन ऑइल सार्डिन माशांच्या घटत्या साठ्याची समस्या मांडली आहे. समुद्राचे वाढते तापमान, बदलता मान्सून, वाढती मासेमारी आणि औद्योगिक मागणी यांचा सागरी परिसंस्था व मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम यातून स्पष्ट होतो. विकासाच्या निर्णयांत निसर्गाला स्थान द्या प्रदर्शनानंतर झालेल्या परिसंवादात द हॅबिटॅट्स ट्रस्टचे संचालक ऋषिकेश चव्हाण यांच्यासह पर्यावरण व वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले. प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव, विज्ञान आणि कथाकथन यांच्या माध्यमातून पर्यावरणीय समस्यांवर व्यवहार्य उपाय शोधण्यावर चर्चा झाली. ‘नैसर्गिक भांडवलाच्या माध्यमातून भारताचा विकास साधता येऊ शकतो. विज्ञान, व्यवस्थात्मक विचार आणि विविध घटकांच्या सहभागातून विकासाला पूरक उपाय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी नेहमीच पर्यायी मार्ग उपलब्ध असतो,’ असे ऋषिकेश चव्हाण यांनी सांगितले.
Source link
पुण्यात चार लघुपटांतून विकास आणि वन्यजीव संवर्धनाचा मेळ:'द हॅबिटॅट्स ट्रस्ट'चा पुढाकार; संशोधन, नियोजन आणि लोकसहभागातून उपायांचा शोध