Headlines

'5 हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार':सर्व निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरा, विजय वडेट्टीवारांची मागणी




राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून 5 हजार रुपयांची अग्रीम मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. दुष्काळ आणि बँकांच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी आणि शक्तीपीठ महामार्गावर सव्वा लाख कोटी उधळणाऱ्या सरकारकडे बळीराजासाठी मात्र पैसे नाहीत, असा संताप व्यक्त करत त्यांनी हे उधळपट्टीचे प्रकल्प थांबवून सर्व निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याची मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी थातूरमातूर उपाययोजना करणाऱ्या सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलं. या राज्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे. शेतकऱ्यांचे हाल आहेत. पुढचं वर्ष कसं जगायचं या चिंतेत शेतकरी आहे. कर्ज वसुलीच्या स्थगितीला बँका प्रतिसाद देत नाही. बँकचे कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांच्या घरात जात आहेत. कर्ज असलेल्या महिलांचे फोटो काढत आहेत. इतकी भयावह परिस्थिती असताना राज्य सरकारने दिवाळीच्या अगोदर पाच हजार रुपये अग्रीम खात्यात टाकण्याची घोषणा केली आणि आज कॅबिनेटमध्ये निर्णय केला. काय होणार या 5 हजार रुपयांनी? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. कुंभमेळ्यावर 35000 कोटी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे? पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सावकारी कर्ज आहे, खाजगी कर्ज आहे, कर्ज काढून शेती केली, एक रुपयासुद्धा घरात आलेला नाही, एक दाणाही आलेला नाही आणि अशा स्थितीत जर तुम्ही पाच हजार रुपये देण्याची घोषणा करताय तर मग त्यांना मला वाटतं की या सरकारची भूमिका शेतकऱ्याला पुन्हा उद्ध्वस्त करण्याची आहे, पुन्हा आत्महत्येत वाढ करण्याची आहे. आणि तुम्ही खंबीरपणे हे सर्व कामं बाजूला करून कशाला गरज आहे पातवीसाठी 700 कोटींची निविदा काढायची? काय गरज आहे तुमच्याकडे पैसे नाहीत आणि कुंभमेळ्यावर 35000 कोटी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे? तुमच्याकडे पैसे नाही आणि शक्तिपीठावर सव्वा लाख कोटी रुपये खर्च करताय. अरे बंद करा हे सगळे आणि सर्व पैसा शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी वापरा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाच हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसू नका शेतकऱ्यांचा आशीर्वाद कुंभमेळ्याच्या डुबकीपेक्षा मोठा असणार आहे. आणि कुंभमेळ्यामध्ये पाप करून डुबकी लावून हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला तारेल. आणि तुम्हीच राहा वाटल्यास सत्तेत, पण किमान हे पाच हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. ही मदत तुटपुंजी मदत नव्हे, तर ही केवळ त्यांच्या भावनेशी खेळ आहे. त्यांच्या भावनेवर जखमेवर मीठ चोळण्याचा असा हा प्रकार आहे. आणि त्यामुळेच या सरकारकडून फार अपेक्षा न बाळगता शेतकऱ्यांना आता आवश्यकता पडल्यास रस्त्यावर उतरून आपल्या अधिकाराची, हक्काची लढाई लढावी लागेल आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *