![]()
राज्यातील वाढता दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता, दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीसाठी कोणतीही जाचक अट नसणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच, राज्यात नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत तब्बल ८३ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ५ हजारांच्या मदतीला अटी-शर्ती नाहीत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने ४० तालुक्यांची भर घालत एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याविषयी बोलताना कृषीमंत्री भरणे म्हणाले, “केंद्राची मदत मिळण्यासाठी काही तांत्रिक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, ज्याला उशीर लागू शकतो. परंतु, दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातात पैसे असावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी ५ हजार रुपयांची ‘रिलीफ’ मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या ५ हजारांच्या मदतीसाठी कोणत्याही प्रकारच्या अटी-शर्ती लागू नसून, याचा शासन निर्णय (GR) लवकरच काढण्यात येईल.” ८३ टक्के पंचनामे पूर्ण; ४-५ दिवसांत काम संपणार राज्यातील नुकसानीच्या सद्यस्थितीची आकडेवारी मांडताना कृषीमंत्र्यांनी सांगितले की, पंचनाम्यांचे काम महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात खरिपाचे एकूण क्षेत्र साधारणतः १ कोटी ५० लाख हेक्टर इतके आहे. त्यापैकी तब्बल १ कोटी २५ लाख हेक्टर क्षेत्रावरील (सुमारे ८३%) नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करून त्याचा अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. केंद्रीय पथकाचा सकारात्मक अहवाल केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत भरणे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “गेल्या चार-पाच दिवसांत केंद्रीय पथकाने राज्यातील तीन विभागांमधील तब्बल ५६ गावांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. रविवारी या पथकाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, राज्य शासनाने दाखल केलेल्या प्रस्तावावर त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी थेट चर्चा केली असल्याने, राज्याला केंद्राकडूनही लवकरात लवकर मोठी मदत मिळेल.” ———– ही बातमी पण वाचा.. राज्य सरकारचा बळीराजाला दिलासा:दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रीम मदत; चारा हमीभावाने खरेदीसह मुख्यमंत्री फडणवीसांचे 4 मोठे निर्णय
राज्यातील दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने बळीराजाला मोठा दिलासा देणारे चार महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये आणखी 40 तालुक्यांची भर घालत आता राज्यातील तब्बल 305 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी मदतीची कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी येण्यास डिसेंबर उजाडतो; परंतु यंदा बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5 हजार रुपयांचा अग्रिम (आगाऊ) निधी थेट वर्ग करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याशिवाय, मराठवाड्यातील भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासाठी 16 हजार अवैध उपसा जोडण्या तोडण्यात आल्या असून, दुष्काळात शेतकऱ्यांनी घेतलेला संपूर्ण चारा शासन हमीभावाने खरेदी करणार आहे. सविस्तर वाचा
Source link