Headlines

Anil Bonde Statement Amravati; Paithani Controversy & Political Attack


“राज्यातील शेतकरी आज गंभीर दुष्काळात होरपळत आहे. खरीप पिके पूर्णपणे गेली असून रब्बीची पेरणीही धोक्यात आली आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत ‘देवाभाऊ’ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे

.

अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार बोंडे यांनी दुष्काळी उपाययोजना, अमरावती शिक्षक मतदारसंघातील ‘प्रसाद-पैठणी’ वाद, बंडखोरी, स्वतःच्या भगिनी संगीता शिंदे यांची उमेदवारी आणि अमेरिकन नागरिकत्व असलेल्या अभिनेत्याच्या आंदोलनातील सहभागावर रोखठोक विधाने केली.

शेतकरी भावांनो खचून जाऊ नका; देवाभाऊ पाठीशी!

अमरावती जिल्ह्यात गेल्या 40 दिवसांत 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या विदारक आकडेवारीवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, “दुष्काळाची अंतिम मदत मिळण्यास शासकीय प्रक्रियेमुळे वेळ लागतो. मात्र, दिवाळी तोंडावर असल्याने राज्यातील सुमारे 1 कोटी 40 लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांची थेट अग्रिम मदत जमा करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. यावर यशोमती ठाकूर ‘भीक’ म्हणून टीका करतात; मात्र त्यांच्या सरकारच्या काळात दुष्काळ, गारपीट किंवा अतिवृष्टीचा साधा एक रुपयाही मिळाला नव्हता. ही अंतिम मदत नसून केवळ सणासाठी दिलेला तात्काळ हातभार आहे.”

जिल्हा नियोजनाचा संपूर्ण निधी दुष्काळावर

“महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीचे (DPDC) इतर सर्व खर्च बाजूला ठेवून संपूर्ण निधी दुष्काळ निवारण, रोजगार हमीची कामे, विहिरींचे खोलीकरण आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यावर खर्च करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांची फी आणि परीक्षा शुल्क माफ झाले असून कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. नैराश्य आल्यास पक्षाचा बूथ प्रमुख, पदाधिकारी, आमदार, खासदार किंवा थेट माझ्याशी संपर्क साधा. कोणत्याही अडचणीत शासन आणि देवाभाऊ मदतीसाठी 24 तास तत्पर आहेत.”

‘सुपर अलनिनो’चे भीषण संकट

राज्यातील पाणीटंचाईवर बोलताना त्यांनी संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली. “हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात ‘सुपर अलनिनो’चे सावट असून हिवाळ्यातही तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी पुढचा पावसाळा येईपर्यंत पाणी पुरवणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी शॉवर आणि फ्लशमध्ये जाणारे पाणी जपून वापरावे, जेणेकरून ग्रामीण भागाला पाणी देता येईल. कमी पाण्यात येणाऱ्या उसाच्या आणि धानाच्या नवीन जातींचा वापर वाढवण्यासाठी, तसेच ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती साखर कारखाने आणि शेतकरी दोघांसाठीही अत्यंत लाभदायी ठरेल.”

पैठणी बदनाम झाली, आता मागणी सोन्याच्या बिस्किटांची!

अमरावती शिक्षक मतदारसंघातील मतांसाठी ‘प्रसाद’ वाटपाच्या व्हायरल व्हिडिओवर आणि बच्चू कडूंच्या विधानावर बोंडे यांनी मिश्कील भाष्य केले. “बच्चू कडू हे गोरगरिबांसाठी काम करणारे नेते आहेत आणि त्यांनी जे काही म्हटले ते मिश्किलपणे म्हटले होते. पण या संपूर्ण प्रकारात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना नाहक बदनाम केले जात आहे. येवल्याची पैठणी बदनाम झाली आणि सरनाईकही बदनाम झाले. एक पैठणी सहा वर्षे पुरत नाही आणि दोन हजार रुपयांत कोणी सहा वर्षांची आमदारकी देत नाही. आता तर लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की पैठणी सोडून थेट ‘सोन्याच्या बिस्किटांपर्यंत’ चर्चा पोहोचली आहे!”

भाजपमध्ये बंडखोरी खपवून घेतली जात नाही

“भाजपने शिस्तभंग करणाऱ्या आपल्या तिन्ही बंडखोर उमेदवारांना तत्काळ पक्षातून निष्कासित केले आहे. मात्र, शिवसेनेच्या बंडखोरांवर अद्याप कारवाई झालेली नाही. पुण्यामध्ये उदय सामंत यांचे ओएसडी संदीप सानप हे शिक्षक रिंगणात उतरून ‘केवळ शिक्षकालाच मतदान करा’ असा प्रचार करत आहेत, त्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.”

बहीण बंडखोर असली तरी मी महायुतीचाच प्रामाणिक कार्यकर्ता!

स्वतःच्या सख्ख्या भगिनी संगीता शिंदे या शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरल्याने भाजप कार्यकर्ते त्यांच्या मागे असल्याच्या आरोपांवर त्यांनी खुलासा केला. “संगीता शिंदे ही माझी रक्ताची बहीण असली तरी तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच बंडखोर आहे. तिने आंतरजातीय विवाह करतानाही स्वतःचा निर्णय स्वतः घेतला. ती नागो गाणार यांच्या शिक्षक परिषदेकडून 12 वर्षांपासून आक्रमकपणे काम करत आहे. तिची विचारसरणी राष्ट्रीय आणि भाजपचीच असल्याने कार्यकर्ते समान असू शकतात.”

मी किरण सरनाईकांचेच काम करणार

“बच्चू कडू यांनी माझ्या निष्ठेवर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराचे आणि त्यांना निवडून आणण्याचे कर्तव्य मी 100 टक्के प्रामाणिकपणे पार पाडणार आहे.”

अमेरिकेच्या ‘डीप स्टेट’च्या इशाऱ्यावर राहुल गांधींचा तांडव

दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या अभिनेता इमरान खानला देश सोडण्याच्या बजावलेल्या नोटीसवर बोंडे यांनी जोरदार हल्ला चढवला. “अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेला व्यक्ती भारतात येऊन निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलनात उतरतो, याचा भारताच्या मतचोरीशी काय संबंध? आंदोलन करायचे असेल तर ट्रम्प यांच्या विरोधात जाऊन करावे.”

विदेशी पैशांवर कळसूत्री बाहुल्या नाचतायत

“हा अमेरिकेत शिजलेला आंतरराष्ट्रीय कट आहे. अमेरिकेतील ‘डीप स्टेट’च्या पैशांवर राहुल गांधी, अभिजित दीपके हे कळसूत्री बाहुल्यांसारखे नाचत आहेत. तिथे चावी भरली की हे सुप्रीम कोर्टावर मोर्चे काढतात आणि पैसे संपले की आंदोलन थांबते. अशा देशविरोधी षड्यंत्रात सहभागी असणाऱ्या परदेशी नागरिकांना केवळ नोटीस न देता देशातून लाथा मारून हाकलले पाहिजे,” असा घणाघाती संताप डॉ. अनिल बोंडे यांनी शेवटी व्यक्त केला.

——————————————————–

हेही वाचा…

MPSC परीक्षेत 62 पैकी 24 टॉपर एकट्या नागपूर केंद्राचे!: सुषमा अंधारेंचे स्फोटक आरोप, TCSऐवजी खासगी व्यक्तीने एक्सेल शीटमधून निकाल कसा लावला?

“स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणारा आणखी एक महाघोटाळा राज्यात उघडकीस आला आहे. माथाडी कामगार निरीक्षक भरती 2026च्या निकालात अवाढव्य गैरप्रकार झाले असून इतर शासकीय परीक्षांमध्ये 2, 4 आणि 10 गुण मिळवणारे संशयास्पद विद्यार्थी या परीक्षेत थेट 198 गुणांसह टॉपर आले आहेत. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांचे मुख्य केंद्र पुणे असताना आणि तिथे हजारो विद्यार्थी बसलेले असताना पुण्याला अवघे 7 गुणवंत; मात्र जिथे नगण्य उपस्थिती होती त्या नागपूर केंद्रावरून 62 पैकी तब्बल 24 जागांवर विद्यार्थी थेट टॉपर कसे काय येतात? टीसीएसच्या अधिकृत प्रणालीऐवजी ‘निधी चांदोरकर’ नावाच्या खासगी व्यक्तीच्या मायक्रोसॉफ्ट 365 एक्सेल शीटमधून हा निकाल कोणी आणि का प्रसिद्ध केला?”, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुराव्यांसह केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.