![]()
“कर्नाटकातील ‘नंदिनी’ गिळंकृत करण्याचा प्रयत्न झाला, मध्य प्रदेशची 10 लाख लिटर क्षमतेची ‘सांची’ डेअरी एनडीडीबीच्या (NDDB) माध्यमातून ताब्यात घेतली गेली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा ‘महानंद’ दूध संघ परस्पर गुजरातच्या हवाली करण्यात आला. आता याच षड्यंत्राचा पुढचा बळी कोल्हापूरचा जगप्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघ ठरवण्याचा महायुतीचा कुटील डाव आहे. गुजरात-बेस्ड ‘सरदार वल्लभभाई पटेल मिल्क फेडरेशन’च्या घशात गोकुळ घालण्यासाठीच महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. गोकुळला चार दारं असून चालणार नाही, सहा जणांना विचारून निर्णय घेईपर्यंत म्हशीचे दूध आटेल अशी अवस्था होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या या संस्थेवर गुजरातचा कब्जा होऊ द्यायचा नसेल, तर या अदृश्य शक्तीला रोखावेच लागेल,” असा अत्यंत घणाघाती आणि स्फोटक आरोप राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडीचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी केला आहे. एका विशेष मुलाखतीत सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुग्ध राजकारणाचा पर्दाफाश केला. तसेच, देशातील स्थानिक सहकारी ब्रँड्स नष्ट करून संपूर्ण दुग्धव्यवस्थेचे एकाच ब्रँडखाली केंद्रीकरण करण्याचे महाभयंकर षड्यंत्र कसे रचले जात आहे, याचा धक्कादायक ताळेबंदच मांडला. स्थानिक ब्रँड्स संपवून ‘अमूल’चे साम्राज्य निर्माण करण्याचा घाट गुजरातस्थित फेडरेशनच्या स्थापनेमागील हेतू स्पष्ट करताना सतेज पाटील म्हणाले, “मागील वर्षी अमूल, बनास आणि गुजरात मिल्क फेडरेशनच्या संयुक्त मालकीखाली ‘सरदार वल्लभभाई पटेल मिल्क फेडरेशन’ ही गुजरात-बेस्ड संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेचा मूळ हेतू देशातील २० राज्यांमध्ये शिरकाव करून तिथले प्रस्थापित स्थानिक दूध संघ गिळंकृत करणे आणि ‘एकाच ब्रँड’खाली देशातील संपूर्ण दुग्ध व्यवसाय केंद्रित करणे हा आहे.” गावागावांतील प्राथमिक संस्था संपवणार “शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या केवळ भूलथापा दिल्या जात आहेत. जर गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली, तर ते राज्य शासनामार्फत गोकुळला एनडीडीबीकडे किंवा थेट सरदार पटेल फेडरेशनकडे वर्ग करतील. गावागावांतील प्राथमिक दूध संस्थांना अडचणीत आणून त्या बंद पाडायच्या आणि तिथले दूध थेट अमूलकडे वळवायचे, ही यामागची खरी खेळी आहे. कोल्हापूरच्या लाल मातीत रक्त सांडून शेतकऱ्यांनी उभा केलेला गोकुळ तिकडे सोपवणे म्हणजे जिल्ह्यावर 100 संकटे ओढवून घेण्यासारखे आहे.” कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि ‘महानंदा’ देशभरात सहकारी दुग्ध संस्थांवर सुरू असलेल्या अतिक्रमणाची उदाहरणे देताना त्यांनी धक्कादायक खुलासे केले. “2022 मध्ये केंद्राने कर्नाटकातील अग्रगण्य ‘नंदिनी’ दूध संघाला अमूलसोबत विलीन करण्याची थेट सूचना दिली होती. मात्र, कर्नाटकातील जनतेने स्वाभिमान जागा ठेवत ‘सेव्ह नंदिनी’चे मोठे जनआंदोलन उभे केले आणि केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली.” मध्य प्रदेशची ‘सांची’ डेअरी ताब्यात घेतली “दररोज तब्बल 10 लाख लिटर दूध संकलन करणाऱ्या मध्य प्रदेशच्या ‘सांची’ डेअरीवर अमूलचा डोळा होता. जनतेच्या विरोधामुळे थेट अमूलला देता आले नाही, म्हणून तेथील सरकारने कायदे बदलून सांची डेअरी आधी एनडीडीबीकडे (NDDB) दिली आणि आता ती सरदार पटेल फेडरेशनकडे सोपवण्याची अंतिम प्रक्रिया सुरू आहे. तामिळनाडूच्या स्थानिक दूध संघावर असाच दबाव आणला गेला; परंतु तेथील मुख्यमंत्र्यांनी ठाम विरोध दर्शवून ही प्रक्रिया तिथल्या तिथे रोखून धरली.” महाराष्ट्राच्या ‘महानंदा’ची शोकांतिका “2024 मध्ये आपल्याच महाराष्ट्रातील ‘महानंद’ दूध संघ राज्य सरकारने स्वतः चालवायला हवा होता किंवा गोकुळसह राज्यातील आघाडीच्या 5-6 मातब्बर दूध संघांशी समन्वय साधून त्याची मालकी महाराष्ट्रातच ठेवायला हवी होती. मात्र, महायुती सरकारने महानंदा थेट एनडीडीबीच्या हवाली करून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली.” गोकुळला एकच दार हवे; राजकीय ‘पैताण’ बाहेर काढूनच काम झाले पाहिजे! गोकुळच्या कारभारातील निर्णयांच्या स्वायत्ततेवर भर देताना सतेज पाटील आक्रमकपणे म्हणाले, “गोकुळसारख्या संवेदनशील संस्थेला एकच दार असले पाहिजे, चार दारं असून उपयोग नाही. महायुतीतील नेत्यांप्रमाणे सहा जणांना फोन करून, एकमेकांची मने सांभाळून निर्णय घेईपर्यंत गोठ्यातील म्हशीचे दूध आटेल अशी अवस्था होईल! सहकारात निर्णय प्रक्रियेत स्थिरता आणि एकमुखी नेतृत्व अत्यंत गरजेचे असते.” साडेपाच लाख शेतकऱ्यांची उपजीविका “जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकरी कोणताही राजकीय पक्ष किंवा जात-पात न पाहता अत्यंत विश्वासाने गोकुळला दूध घालतात. दर दहाव्या दिवशी शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे खात्यात टाकणारी ही एकमेव विश्वासार्ह संस्था आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले राजकीय ‘पैताण’ बाहेर काढूनच या सहकार मंदिरात पाऊल ठेवले पाहिजे.” जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री ज्या ‘अदृश्य शक्ती’चे नाव घेण्यास घाबरतात, ती शक्ती कोण? महायुतीतील स्थानिक मातब्बर नेत्यांच्या हतबलतेवर त्यांनी तीव्र ताशेरे ओढले. “महायुतीमधील नेते—मग ते विनय कोरे असोत, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर की राजेंद्र पाटील यड्रावकर—हे सर्वजण आपापल्या साखर कारखान्यांत आणि संस्थांमध्ये एकाधिकारशाहीने स्वतंत्र निर्णय घेतात. मग गोकुळच्या बाबतीत हे सर्व नेते इतके लाचार आणि हतबल का होतात?” अदृश्य शक्तीच्या स्वाधीन गोकुळ करणार का? “जिल्ह्यातील विद्यमान कॅबिनेट मंत्री ज्या ‘अदृश्य शक्ती’चे साधे नाव घेण्याचीही हिंमत दाखवू शकत नाहीत, ती शक्ती नक्की किती मोठी आहे? त्या अदृश्य शक्तीच्या स्वाधीन गोकुळ करणे म्हणजे कोल्हापूरचा दूध संघ परस्पर गुजरातच्या सरदार पटेल फेडरेशनच्या हवाली करण्यासारखेच आहे.” मुंबईतून रिमोट कंट्रोल चालणार नाही “गोकुळच्या निवडणुकांमधील जागावाटपापासून ते चेअरमन कोण होणार, इथपर्यंतचे सर्व निर्णय जर मुंबईत बसून मुख्यमंत्री ठरवणार असतील, तर ही कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेची क्रूर चेष्टा आहे. आमच्या हातून चांगले काम झाले तर शेतकऱ्यांनी पाठीवर कौतुकाची थाप टाकावी आणि काही चुकले तर कॉलर पकडून जाब विचारावा, यासाठी मी 24 तास जिल्ह्यात हजर असतो; पण गोकुळचा कारभार जर मुंबईतून चालवला गेला, तर संकटात सापडलेला सामान्य शेतकरी मुंबईत जाऊन कोणाला जाब विचारणार?”, असा परखड सवाल सतेज पाटील यांनी शेवटी केला. ————————————————————- हेही वाचा… कर्नाटक सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतेय…: केंद्राच्या मदतीची वाट न पाहता सरकारने तातडीने दिलासा दिला, विरोधकांनी कर्नाटकचे वास्तव पाहावे- नवनाथ बन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसमोर काय पत आणि इज्जत आहे, हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. राहुल गांधींनी कॉलर धरून त्यांना मागे खेचले होते आणि आता तेथील सरकार शेतकऱ्यांना कॉलर धरून मागे खेचण्याचे काम करत आहे. ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे काँग्रेस शेतकऱ्यांना भरीव मदत का करत नाही? असा थेट सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
6 जणांना विचारून निर्णय होईपर्यंत म्हशीचं दूध आटेल!:'महानंद'प्रमाणेच कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा छुपा डाव; सतेज पाटलांचा आरोप