Headlines

पोलिसांच्या बळावर जमिनी लाटणे म्हणजे हुकूमशाही!:बळजबरीने मोजणी केल्यास रस्त्यावर उतरणार, जयंत पाटलांचा राज्य सरकारला इशारा




“सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि जमीनधारकांचा शक्तिपीठ महामार्गाला गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांची संमती नसताना शेकडो पोलिसांचा फौजफाटा नेऊन शेतकऱ्यांना घेरले जाते, धमकावले जाते आणि त्यांच्या जमिनींची जबरदस्तीने मोजणी केली जाते. या दडपशाहीमुळे हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचला, तरीही महसूल आणि पोलीस यंत्रणेला कोणताही पाझर फुटत नाही. महसूल विभागाचे काम पोलीस करत असून शेतकऱ्यांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. हा सरकारी यंत्रणा आणि अधिकारांचा उघड गैरवापर आहे. हा प्रकार ताबडतोब थांबला नाही आणि उद्या पुन्हा जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न झाला, तर महाविकास आघाडीचे सर्व लोकप्रतिनिधी स्वतः मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या बाजूने हाणून पाडतील,” असा संतप्त व थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिला आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तिपीठ महामार्गाच्या जबरदस्तीने सुरू असलेल्या भूसंपादनाविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. या बैठकीला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज (बंटी) पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचे रक्षण करण्याऐवजी पोलीसच धमकावतायत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. “पोलीस प्रशासनाचे काम प्रत्यक्ष जागेवर कायदा व सुव्यवस्था राखणे आणि महसूल अधिकारी व शेतकरी दोघांनाही संरक्षण देणे हे आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात पोलीसच शेतकऱ्यांच्या छातीवर बसून ‘तू सही कर, काहीही झाले तरी तुला जमीन द्यावीच लागेल’ अशी दादागिरी करत आहेत. संमती नसताना होणारी ही जॉइंट मेजरमेंट तात्काळ थांबवावी, असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.” लोकप्रतिनिधींना पाच मिनिटांचा वेळ नाही “गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी, स्थानिक खासदार आणि आमदार या प्रकल्पाविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, सरकारने लोकप्रतिनिधींची भूमिका ऐकून घेण्यासाठी साधी ५ मिनिटांची वेळही दिलेली नाही. ही लोकशाही नसून उघड हुकूमशाही सुरू आहे.” दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची भीक का? शासनाच्या आर्थिक धोरणांवर आणि दुष्काळी मदतीवर टीका करताना ते म्हणाले, “राज्यातील शेतकरी दुष्काळाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या अग्रिम मदतीने शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना वाढीव भरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांना मदत द्यायला तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगणारे सरकार शक्तीपीठासारख्या अनावश्यक प्रकल्पांवर उधळपट्टी करण्यासाठी हजारो कोटी कुठून आणत आहे?” 1 लाख कोटींची शासकीय देणी थकीत “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP), सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर सर्व विभागांची मिळून कंत्राटदारांची तब्बल 1 लाख कोटी रुपयांची बिले शासनाने थकवून ठेवली आहेत. एका बाजूला लोकांचे घामाचे पैसे थकवायचे आणि दुसऱ्या बाजूला 5 ते 10 टक्के तरतूद करून कंत्राटदार पोसण्यासाठी नवे प्रकल्प काढायचे, असा उद्योग सुरू आहे.” अर्थ खात्याचा विरोध असतानाही हट्ट का? “86 हजार कोटींचा हा शक्तिपीठ महामार्ग आता 1 लाख कोटींवर गेला आहे. एकट्या भूसंपादनासाठी 22 ते 28 हजार कोटी रुपये लागणार आहेत. हुडकोकडून (HUDCO) कर्ज काढताना तत्कालीन वित्तमंत्री आणि वित्त व नियोजन विभागाने स्पष्ट शेरा मारला होता की, ‘हा प्रकल्प राज्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.’ तरीही हा प्रकल्प एका व्यक्तीच्या हट्टापायी शेतकऱ्यांच्या माथी का मारला जात आहे? हा हट्ट सरकारने बाजूला ठेवून हा प्रकल्प संपूर्ण 12 जिल्ह्यांत तत्काळ रद्द करावा.” संसाराचा खर्च 20 हजारांवरून 40 हजारांवर! देशातील आणि राज्यातील बिकट आर्थिक स्थितीवर बोट ठेवताना त्यांनी आर्थिक शहाणपणाने निर्णय घेण्याचा सल्ला दिला. “घाऊक व किरकोळ बाजारात महागाईने उच्चांक गाठला असून साखर, तेल, ज्वारीसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पूर्वी ज्या कुटुंबाचा संसार 20 हजारांत चालत होता, त्याला आज 40 हजार रुपयेही अपुरे पडत आहेत.” परकीय गुंतवणूक बाहेर पडली “चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी (FDI/FII) देशातून पैसा काढून घेतला आहे, शेअर बाजार कोसळत आहे. अशा गंभीर आर्थिक संकटाच्या काळात सरकारने अनावश्यक प्रकल्प बाजूला ठेवून अलनिनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या दुष्काळाला तोंड देण्याला आणि शेतकरी व जनावरांना जगवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.” एसटीचे खाजगीकरण थांबवा “ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एसटी महामंडळ खाजगीकरणाच्या नावाखाली संपवण्याचे काम सुरू आहे. 6 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संपावर जात आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना जी मोठी आश्वासने दिली होती, त्याचे काय झाले? त्याचे उत्तर आता पडळकरांनी दिले पाहिजे.” मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे स्पष्टीकरण पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत विचारले असता, “आम्ही कोणताही एकत्र प्रवास केलेला नाही. काही प्रशासकीय व सार्वजनिक प्रश्नांवर त्यांना माहिती हवी होती, त्या अनुषंगाने ती केवळ एक औपचारिक चर्चा झाली,” असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला. उद्या मोजणी झाल्यास खासदार स्वतः शेतात उतरणार! खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी सुरू केली, तर ते स्वतः प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मोजणी होऊ देणार नाहीत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष येत्या 24 तासांत आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ———————————————————– हेही वाचा…. MPSC परीक्षेत 62 पैकी 24 टॉपर एकट्या नागपूर केंद्राचे!: सुषमा अंधारेंचे स्फोटक आरोप, TCSऐवजी खासगी व्यक्तीने एक्सेल शीटमधून निकाल कसा लावला? “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणारा आणखी एक महाघोटाळा राज्यात उघडकीस आला आहे. माथाडी कामगार निरीक्षक भरती 2026च्या निकालात अवाढव्य गैरप्रकार झाले असून इतर शासकीय परीक्षांमध्ये 2, 4 आणि 10 गुण मिळवणारे संशयास्पद विद्यार्थी या परीक्षेत थेट 198 गुणांसह टॉपर आले आहेत. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांचे मुख्य केंद्र पुणे असताना आणि तिथे हजारो विद्यार्थी बसलेले असताना पुण्याला अवघे 7 गुणवंत; मात्र जिथे नगण्य उपस्थिती होती त्या नागपूर केंद्रावरून 62 पैकी तब्बल 24 जागांवर विद्यार्थी थेट टॉपर कसे काय येतात? टीसीएसच्या अधिकृत प्रणालीऐवजी ‘निधी चांदोरकर’ नावाच्या खासगी व्यक्तीच्या मायक्रोसॉफ्ट 365 एक्सेल शीटमधून हा निकाल कोणी आणि का प्रसिद्ध केला?”, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुराव्यांसह केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *