Headlines

हेक्टरी 20 हजार रुपयांची मदत द्या!:विजय वडेट्टीवारांची मागणी, म्हणाले- करपा-खोडकिडीने शेती उद्ध्वस्त, तरीही दुष्काळाच्या यादीतून गडचिरोलीचे 5 तालुके हद्दपार




“राज्यात दुष्काळ जाहीर करतानाही सत्ताधारी महायुतीने अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले असून, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय व दुजाभाव केला जात आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड, भीषण करपा आणि खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे गडचिरोलीतील पिके डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाली असताना आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा, कोरची आणि धानोरा या पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीबाहेर ठेवण्यात आले. पत्राद्वारे वारंवार मागणी करूनही शासनाने या आदिवासीबहुल भागाकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का? बाधित शेतकऱ्यांच्या हक्काचा एक रुपयाही बुडू देणार नाही; या वगळलेल्या तालुक्यांचा तात्काळ दुष्काळात समावेश करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर किमान 20 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत जाहीर करावी,” असा संतप्त व आक्रमक इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या (X/ट्विटर) माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळी धोरणावर जोरदार प्रहार करत चंद्रपूर आणि गडचिरोलीतील वगळलेल्या तालुक्यांच्या हक्कासाठी आरपारच्या संघर्षाची हाक दिली आहे. पावसाचा खंड, करपा आणि खोडकिडीने पिके उद्ध्वस्त; 5 तालुके यादीबाहेर का? गडचिरोली जिल्ह्यातील विदारक परिस्थिती मांडताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा, कोरची आणि धानोरा या पाच तालुक्यांमध्ये यंदा पावसाने तब्बल महिना-दीड महिना दडी मारली. त्यानंतर आलेल्या पिकांवर करपा रोगाचा आणि खोडकिडीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. त्यामुळे खरीप पिके, विशेषतः भातशेती पूर्णपणे करपून भुईसपाट झाली आहे.” पत्राकडे शासनाचे दुर्लक्ष “या नैसर्गिक आपत्तीची माहिती देऊन आम्ही राज्य सरकारला रीतसर पत्र पाठवले होते. प्रत्यक्ष वस्तुस्थितीची जाणीव करून देत या पाचही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या सुधारित यादीत समावेश करण्याची आग्रही मागणी केली होती. मात्र, सरकारने या रास्त मागणीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत या पाचही तालुक्यांना यादीबाहेर ठेवण्याचे अमानुष कृत्य केले आहे.” सत्ताधाऱ्यांचे घाणेरडे राजकारण दुष्काळ जाहीर करण्याच्या शासकीय पद्धतीवर आणि राजकीय भेदभावावर ताशेरे ओढताना वडेट्टीवार म्हणाले, “राज्य सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 305 पर्यंत वाढवली. मात्र, या सुधारित यादीतही चंद्रपूर आणि गडचिरोलीतील सर्वाधिक बाधित भागांना वगळण्यात आले. सत्ताधारी आपल्या मर्जीतील तालुक्यांना झुकते माप देतात आणि विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या किंवा आदिवासीबहुल जिल्ह्यांवर सूडबुद्धीने अन्याय करतात, हे यातून स्पष्ट झाले आहे.” शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत नाही “आज शेतात काहीही पिकलेले नाही, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बँकेचे कर्ज आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे भागवायचे, या चिंतेत शेतकरी अश्रू ढाळत आहेत. सरकारला शेतकऱ्यांच्या या आक्रोशाची आणि भीषण परिस्थितीची अजिबात जाणीव उरलेली नाही,” असा घणाघात त्यांनी केला. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयांची तत्काळ मदत द्या! शासनाला जाब विचारताना विजय वडेट्टीवार यांनी ठाम मागण्या मांडल्या. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या पाचही तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र व बाधित तालुक्यांचा विलंब न करता दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा. दुष्काळ आणि कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला कोणत्याही किचकट अटींशिवाय प्रतिहेक्टर २० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत त्वरित बँक खात्यात जमा करावी. या तालुक्यांमध्ये तात्काळ महसूल वसुलीला स्थगिती, कृषी कर्जाचे पुनर्गठन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे आणि जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची युद्धपातळीवर व्यवस्था करणे आवश्यक आहे. “शेतकऱ्यांच्या हक्काचा एक रुपयाही आम्ही बुडू देणार नाही. जर सरकारने तातडीने सुधारित शासन निर्णय काढून या तालुक्यांचा समावेश केला नाही, तर या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी शेवटी दिला. ——————————————————— हेही वाचा…. MPSC परीक्षेत 62 पैकी 24 टॉपर एकट्या नागपूर केंद्राचे!: सुषमा अंधारेंचे स्फोटक आरोप, TCSऐवजी खासगी व्यक्तीने एक्सेल शीटमधून निकाल कसा लावला? “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणारा आणखी एक महाघोटाळा राज्यात उघडकीस आला आहे. माथाडी कामगार निरीक्षक भरती 2026च्या निकालात अवाढव्य गैरप्रकार झाले असून इतर शासकीय परीक्षांमध्ये 2, 4 आणि 10 गुण मिळवणारे संशयास्पद विद्यार्थी या परीक्षेत थेट 198 गुणांसह टॉपर आले आहेत. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांचे मुख्य केंद्र पुणे असताना आणि तिथे हजारो विद्यार्थी बसलेले असताना पुण्याला अवघे 7 गुणवंत; मात्र जिथे नगण्य उपस्थिती होती त्या नागपूर केंद्रावरून 62 पैकी तब्बल 24 जागांवर विद्यार्थी थेट टॉपर कसे काय येतात? टीसीएसच्या अधिकृत प्रणालीऐवजी ‘निधी चांदोरकर’ नावाच्या खासगी व्यक्तीच्या मायक्रोसॉफ्ट 365 एक्सेल शीटमधून हा निकाल कोणी आणि का प्रसिद्ध केला?”, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुराव्यांसह केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *