Headlines

पुणे ग्रँड टूर रद्द करा, 113 कोटींचा खर्च टाळा:महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट, निधी विकासकामे आणि दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्याची मागणी




पिंपरी-चिंचवड महापालिकेची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रातील संभाव्य दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन यंदाची आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा रद्द करावी. स्पर्धेसाठी प्रस्तावित ११३ कोटी रुपयांचा खर्च टाळून हा निधी शहरातील विकासकामे आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून, ठेवी मोडण्याची आणि कर्ज घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ठेकेदारांची सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची देणी थकली असल्याचा दावा भापकर यांनी निवेदनात केला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करणे म्हणजे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका त्यांनी केली. मागील वर्षी झालेल्या पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील ५४ किलोमीटरच्या मार्गावर सुमारे ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा स्पर्धेची दुसरी आवृत्ती पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात सहा टप्प्यांत होणार आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातून ११३ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण, गतिरोधक काढणे, पदपथांची उभारणी व दुरुस्ती, रस्त्यांवरील दिशादर्शक फलक, रंगकाम आणि विद्युत रोषणाई यांसाठी ११३ कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे. दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा खर्च करणे अनुचित आहे. शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याच्या नावाखाली होणारा हा खर्च नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणारा आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे स्पर्धा रद्द करून हा निधी शहराच्या विकासासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *