Headlines

हुंडाईचा तळेगावात 11 हजार कोटींचा वाहन प्रकल्प सुरू:महाराष्ट्राचा वाहन उत्पादनात 23 टक्के वाटा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन




देशाच्या एकूण वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा २३ टक्के, तर वाहन निर्यातीत २६ टक्के वाटा आहे. राज्यात उद्योगांच्या विस्तारासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा वेगाने विकसित करण्यात येत आहेत. वाहन उद्योगातील संधी वाढत असून, त्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि सुविधा निर्माण केल्या जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे दक्षिण कोरियाच्या हुंडाई कंपनीच्या अत्याधुनिक वाहन उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, दक्षिण कोरियाचे राजदूत ली सियांग हो, हुंडाई कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी युईसून चुंग आणि कंपनीच्या पुणे विभागाचे व्यवस्थापकीय संचालक तरुण गर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री सुरेश वाडकर यांनी गणेशवंदना सादर केली. फडणवीस म्हणाले, भारतीय आणि परदेशी ग्राहकांना वाहनांचा पुरवठा करण्यासाठी तळेगावमधील हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रकल्प उभारणीदरम्यान निर्माण झालेल्या विविध अडचणी राज्य सरकारने दूर केल्या. सुरुवातीला सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे कंपनीने ठरवले होते. आता ही गुंतवणूक ११ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला वर्षाला एक लाख ७० हजार कार निर्मितीचे लक्ष्य होते. आता ते तीन लाख ३० हजार कारपर्यंत वाढवण्यात आले आहे. हुंडाई कंपनीशी आपल्या कुटुंबाच्या आठवणी जोडलेल्या आहेत. पत्नी नागपूर येथे ॲक्सिस बँकेत कार्यरत असताना आम्ही पहिली कार हुंडाई सेंट्रो घेतली होती. त्यानंतरही कंपनीच्या विविध कार वापरल्या आहेत. आता महाराष्ट्रात कंपनीच्या माध्यमातून वाहननिर्मिती होत असून, त्यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले. भविष्यात हायब्रीड आणि चालकविरहित कारच्या निर्मितीला महत्त्व प्राप्त होईल. मात्र, भारतातील वाहतूक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन चालकविरहित कारच्या तंत्रज्ञानात आवश्यक बदल करावे लागतील. राज्य सरकार उद्योगांना एक खिडकी योजनेतून विविध परवानग्या तातडीने उपलब्ध करून देत आहे. आगामी ३० वर्षांत हुंडाईचा महाराष्ट्रातील विस्तार मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. पुण्यातून जगभरातील कामकाजाचे समन्वयन करणारी यंत्रणा उभी राहील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. २०३० पर्यंत दररोज तीन हजार कार निर्मितीचे लक्ष्य तरुण गर्ग म्हणाले, हुंडाई कंपनी गेल्या ३० वर्षांपासून भारतात कार्यरत आहे. तळेगावमधील नवीन प्रकल्पासाठी ३०० एकर जागा घेण्यात आली असून, ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जागतिक दर्जाचे अत्याधुनिक उत्पादन केंद्र येथे उभारण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत प्रकल्पातील ८३ टक्के काम देशांतर्गत पातळीवर केले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *